महाराष्ट्र बुलेटिन : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) नव्याने होत असलेल्या विकास आराखड्यात आव्हाळवाडी, केसनंद, वाघोली व मांजरी खुर्द या गावांचा समावेश रहिवास झोनमध्ये करण्यात यावा अशी मागणी नगरविकास, सार्वजनिक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केली आहे. याबाबत एकनाथ शिंदे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांना सूचना केल्याने या गावांचा झोन लवकरच ‘रहिवासी’ होणार आहे.
ज्ञानेश्वर कटके यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, पुढील महिन्यात ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये हवेली तालुक्यातील आव्हाळवाडी, केसनंद, वाघोली व मांजरी खुर्द या गावांचे सर्वेक्षण करून गावठाण व रहिवासी झोन तसेच या गावांच्या हद्दीतील झोन बदलाचे सरचार्ज कमी करावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे. या बदलानंतर पीएमआरडीएचा अहवाल प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यावर सूचना मागवून अंमलबजावणी होणार आहे. तत्पूर्वी या गावांबाबत गावठाण तसेच रहिवासी झोनची मागणी करण्यात आली आहे.
विशेष बाब म्हणजे खराडी आयटी पार्क शेजारी असलेली ही गावे स्वतंत्र महसुली आहेत. बहुतांश भागामध्ये बांधकामे झाली आहेत. रहिवासी झोन नसल्याने बांधकाम परवानगी घेणे व बांधकाम नकाशे मंजूर करण्यात नागरिकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे सदर गावांना रहिवासी झोन करण्यात यावे, अशी मागणी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे, असे ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले.