Skip to content Skip to footer

तुम्ही मला मुलासारखे, आजीबाईंचा आदित्य ठाकरेंना आशीर्वाद

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा “आदित्य संवाद” हा तरुणांसाठी असतो, परंतु आज नगर येथील आदित्य संवाद कार्यक्रमात एका ६५ वर्षाच्या आजीबाईंनी आपलं गाऱ्हाणं घेऊन उपस्थिती लावली. आदित्य ठाकरेंनीही त्यांना आदरपूर्वक बोलण्याची संधी दिली. यावेळी आजीबाईंनी “पुत्रतुल्य आदित्यसाहेब ठाकरेंचं ऐतिहासिक अहमदनगर शहरात स्वागत” असं म्हणत बोलायला सुरुवात केली, मात्र आदित्य ठाकरेंनी मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे मला साहेब म्हणू नका असं सांगितलं. यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. यानंतर आजीबाईंनी माझ्या पुत्रासमानच आहेत तुम्ही असं म्हणत आपलं गाऱ्हाणं आदित्य ठाकरेंपुढे मांडलं.

आजीबाईंनी

“मी गेली साडेचार वर्षे पेन्शन मिळण्यासाठी ५० ते ६० वेळा मंत्रालयात चकरा मारल्या, परंतु माझं काम झालं नाही. माझ्या पतीच्या निधनामुळे मी खचून गेले आहे, माझ्या पायात आता बळ नाही. आता कंटाळून गेले आहे. मी पात्र असून मला पेन्शन मिळत नाही. मला मुख्यमंत्र्यांना भेटू दिलं जात नाही. तुम्ही माझं काम करा” असं डोळ्यात पाणी आणून सांगितलं. यावर आदित्य ठाकरेंनी “तुमचं काम मी आजच्या आज करतो आणि यासाठी तुम्हाला मंत्रालयात यावं लागणार नाही” असं उत्तर दिलं आणि सभागृहातील उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करत आदित्य ठाकरेंच्या कार्यतत्परतेला दाद दिली.

या आजीबाई उच्चशिक्षित असून त्यांच्या पतीचं निधन झालं आहे.मनाने खचलेल्या आजीबाईंना थरथरणाऱ्या हातात माईक घेऊन डोळ्यात असलेल्या पाण्यासह आदित्य ठाकरेंकडे प्रश्न मांडताना पाहून सभागृह एकदम स्तब्ध झालं होतं. या आजींनी बोलताना “मी तीन विषयांत एमए आहे, एमएड आहे माझ्याकडे सात पदव्या असून मी एमएच सीआयटी सुद्धा केलेलं आहे” असं सांगताच सभागृहात आजीबाईंच टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केलं गेलं. खुद्द आदित्य ठाकरेंनीही टाळ्या वाजवून आजींना उच्चशिक्षणाबद्दल दाद दिली.

दरम्यान एकाच कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी अनेक प्रश्न चुटकीसरशी सोडवल्याने सभागृहातील उपस्थितांकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं जात होतं. अलीकडच्या काळात समस्या ऐकून तात्काळ सोडवणारा युवानेता पाहिला नाही. आदित्य ठाकरेंचं भविष्य नक्कीच उज्ज्वल असेल. ते मुख्यमंत्री झाले तर असा कामांचा धडाका राज्यभरात पाहायला मिळू शकतो. कोणत्याही पदावर नसताना आदित्य ठाकरे इतक्या तत्परतेने समस्या सोडवतात तर मुख्यमंत्री झाल्यावर ते नक्कीच महाराष्ट्रात अनेक कामं करतील अशा चर्चा उपस्थितांमध्ये रंगल्या होत्या.

 

शेतकऱ्यांनी केली आदित्य ठाकरेंची धान्यतूला,धान्याचं गरजूंना वाटप

Leave a comment

0.0/5