Skip to content Skip to footer

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार !

मुंबई विद्यापीठाची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित होणार !

मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परदेशात पुढील शिक्षणासाठी तसेच नोकरीसाठी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे आता ऑनलाईन साक्षांकित करुन मिळणार आहेत. या संगणकीय साक्षांकन प्रक्रियेचे उद्घाटन पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या डिजिटल सेवेचे उद्घाटन करताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई विद्यापीठाने कमीत कमी वेळेत आणि अत्यल्प खर्चात विद्यार्थ्यांना ऑनलाईन साक्षांकनाची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा विद्यार्थी केंद्रीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.

तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या सुविधेचा खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कालपरत्वे बदलणाऱ्या शिक्षण पद्धतीनुसार विद्यापीठाने कालसुसंगत अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. मुंबई विद्यापीठ हे देशातील सर्वात जुने विद्यापीठ असून, या विद्यापीठाच्या नावलौकिकासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे असून विद्यापीठातील नवीन उपक्रमांना शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरण मंत्री यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या या उद्घाटन सोहळ्यास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर, प्र-कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्यासह व्यवस्थापन परिषद आणि अधिसभेचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Leave a comment

0.0/5