नायर रुग्णालयात हलवणार
करोनाच्या थैमानामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे नागरिक बाहेर पडायचंही टाळत आहेत. तर काहीजण बाहेर पडल्यानंतर काळजी घेताना दिसत आहेत. अशा काही करोना बाधितांकडून अक्षम्य चुका होत असल्याचंही दिसत असून, असाच एक प्रकार मुंबईत घडल्याचं समोर आलं आहे. मुलूंड परिसरात एक करोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे फिरत होता. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेनं त्या रुग्णाचा ठिकाणा शोधून त्याला पुन्हा रुग्णालयात दाखलं केलं.
मिड-डेनं या घटनेसंदर्भातील वृत्त दिलं आहे. एक करोनाबाधित रुग्ण सर्रासपणे रस्त्यांवर फिरत असल्याचं बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यावरून महापालिकेनं कारवाई करत त्या व्यक्तीचा ठिकाणा शोधला. त्यानंतर त्या व्यक्तीला मिठाघर येथील कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आलं.
या घटनेची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. “सीताराम कांबळे असं त्या करोनाबाधित रुग्णाचं नावं आहे. ते मानसिक आजारातून जात आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये असताना कांबळे यांनी डॉक्टर आणि नर्सना त्रास दिला होता. आता आम्ही मानसिक आजाराच्या समस्या असलेल्या करोनाबाधित रुग्णांसाठी एक कोविड सेंटर सुरू केलं आहे. हे नवीन कोविड सेंटर नायर रुग्णालयात असेल, जिथे कांबळे यांना लवकरच हलवण्यात येणार आहे,” असं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं.