ऑगस्टच्या अखेरीस वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाइक शेअरिंगची सुविधेची सुरुवात झाली
पंधरवडय़ापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू करण्यात आलेल्या युलु ई-बाइकसाठी नुकतेच कलानगर येथेही स्थानक सुरू केले आहे. प्रवाशांच्या मागणीस प्रतिसादानुसार हे स्थानक सुरू के ले असून, दिवसाला दोनशेच्या आसपास प्रवासी युलु ई-बाइकचा वापर करत आहेत.
ऑगस्टच्या अखेरीस वांद्रे-कुर्ला संकुलात युलु ई-बाइक शेअरिंगची सुविधेची सुरुवात झाली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि युलु बाइक यांच्या संयुक्त माध्यमातून ही सुविधा सुरू करण्यात आली. ई-बाइक शेअरिंगची सुविधा मुंबईत प्रथमच उपलब्ध झाली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात युलु ई-बाइकसाठी दहा स्थानके तयार केली आहेत. वांद्रे पूर्व स्थानकाबाहेरदेखील ही सुविधा आहे. मात्र सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या मर्यादित असून, अनेक प्रवाशांनी कलानगर येथे स्थानक करण्याची मागणी केल्याने हे स्थानक तीन दिवसांपूर्वी सुरू केल्याचे, युलु बाइकचे श्रेयांस शहा यांनी सांगितले. पश्चिम द्रुतगती मार्गावरून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे स्थानक उपयोगी ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्वच कार्यालयात मर्यादित कर्मचारी संख्या तसेच करोनाच्या प्रसाराबाबत मनात असलेली भीती यामुळे युलु ई-बाइकला प्रतिसाद मर्यादित असला तरी दिवसातून दोनशे ते तीनशे प्रवासी याचा वापर करत असल्याचे, शहा यांनी नमूद केले. पुढील टप्प्यात १८ स्थानकांवर पाचशे ई-बाइक उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. अद्याप कुर्ला (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळ स्थानक उपलब्ध नसून, त्याबाबतत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.