चार नव्या लोकल; ऐरोली, घणसोली स्थानकांत थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल
मध्य रेल्वे प्रशासनाने गुरुवारपासून ट्रान्स हार्बर मार्गावर चार नव्या लोकल फे ऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष लोकल गाडय़ांना ऐरोली आणि घणसोली स्थानकांमध्ये थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोन्ही स्थानकांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रस्ते मार्गाने जवळील रेल्वे स्थानक गाठून लोकल पकडावी लागणार आहे.
टाळेबंदी शिथिलीकरणानंतर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात लोकल सेवा सुरू करण्यात आल्या. ठाणे ते वाशी आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ठाणे ते वाशीसाठी सकाळी एक आणि सायंकाळी आशा दोनच लोकल सोडण्यात येत होत्या. या दोन लोकलमुळे ट्रान्स हार्बर मार्गाची लोकल सेवा सुरू असूनही नसल्यासारखी होती.
त्यामुळे नवी मुंबई, पनवेलमधून ठाणे किंवा मुंबई गाठण्यासाठी किंवा ठाण्याहून नवी मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांना खासगी वाहनांचा आणि बसचा वापर करावा लागत होता. रस्ते मार्गाने सुरू असलेल्या या प्रवासाला अधिकचा कालावधी लागत असल्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलची संख्या वाढवण्याची मागणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.
या मागणीनुसार १ ऑक्टोबरपासून ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेलसाठी चार नव्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी या विशेष लोकल गाडय़ांना ऐरोली आणि घणसोली स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
लोकल थाबंत नसल्यामुळे ऐरोली आणि घणसोलीकडे जाण्यासाठी आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रबाळे या स्थानकात उतरून पुन्हा रिक्षा किंवा बसने पुढील प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवून उपयोग तरी काय, अशा प्रतिक्रिया आत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
मी ऐरोली येथे राहात असून ठाण्यातील खासगी रुग्णालयात नोकरीला आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची परवानगी असली तरी ऐरोली स्थानकात लोकल थांबत नसल्यामुळे या सेवेचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे आणखी काही दिवस बसनेच प्रवास करावा लागणार असून कळवा नाक्याच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढावा लागणार आहे.
– क्रांती शिंदे, ऐरोली
लोकलची संख्या वाढवली असली तरी त्यांना ऐरोली आणि घणसोली स्थानकात थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे रिक्षा किंवा बसला खर्च करून रबाळे स्थानक गाठावे लागेल. त्यानंतर लोकलचा प्रवास करता येईल, त्यामुळे लोकलच्या फेऱ्या वाढवून उपयोग नाही.
– सुमेध मोहिते, ठाणे