कुलाबा ते सिप्झ या संपूर्ण भुयारी मार्गिकेतील भुयारीकरणाचा ३२ वा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. या टप्प्यानंतर संपूर्ण मार्गिकेवरील एकूण ८७ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले.
‘मेट्रो ३’ मार्गिकेच्या भुयारीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) सोमवारी सिद्धिविनायक उत्तर शाफ्ट ते दादर मेट्रो स्थानकदरम्यानचे १.१० किमी अंतर पार केले. हेरेननेच बनावटीच्या या टीबीएममध्ये भूगर्भदाब नियंत्रण तंत्रज्ञानाचा समावेश आहे. या टीबीएमने १६ डिसेंबर २०१९ ला भुयारीकरणास सुरुवात केली होती. एकूण २९५ दिवसात ७९१ रिंगच्या साहाय्याने अप-लाइनवरील १.१० किमी भुयारीकरण सोमवारी पूर्ण केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी उपस्थित होते. ‘नागरिकांना कामामुळे होणारा त्रास कसा कमी होईल याचा विचार करून हे महत्त्वपूर्ण आणि अवघड काम पूर्ण करणे कौतुकास्पद आहे. यामुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक सुविधेमध्ये सकारात्मक बदल होणार असून हे एक वरदान ठरणार आहे,’ असे कुंभकोणी म्हणाले.भुयारीकरणाच्या या टप्प्याचा समावेश पॅकेज ४ मध्ये होत असून त्यामध्ये सिद्धिविनायक ते शीतलादेवी या अंतराचा समावेश आहे. या टप्प्यातील एकूण ९४ टक्के भुयारीकरण आणि ९५ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. संपूर्ण ३१ किमी मार्गिकेपैकी एकूण ८७ टक्के भुयारीकरण आणि ६० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे.
‘दादर मेट्रो स्थानक रहिवासी इमारती आणि व्यापारी आस्थापना यांच्यामध्ये बांधण्यात आले असून मार्गिकेवरील हे महत्त्वाचे स्थानक आहे. त्यामुळे आजचा भुयारीकरणाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे आव्हानात्मक होते,’ असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल म्हणाले.