Skip to content Skip to footer

करोना नियंत्रित ठेवण्यासाठी पालिका कटीबद्ध – आयुक्त चहल

मास्क न घालणाऱ्या २० हजार लोकांवर होणार रोज कारवाई

गेल्या महिन्याच्या तुलनेत करोना चाचण्यांचे प्रमाण दुप्पट केल्यामुळेच आज मुंबईत दोन हजाराच्या आगेमागे रुग्णसंख्या दिसत आहे. करोना नियंत्रणासाठी महापालिका कटीबद्ध असून आजपासून मास्क न घालणाऱ्या व सोशल डिस्टसिंगचे पालन न करणाऱ्या किमान २० हजार लोकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले.

मुंबईची करोना परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. अनलॉकिंग व हॉटेल – रेस्तराँ सुरु झाल्यानंतर झाल्यानंतर मुंबई पुन्हा गजबजू लागली आहे. यातून करोना पसरू नये यासाठी लोकांनीही मास्कचा काटेकोरपणे वापर करणे गरजेचे आहे. लोकांनी मास्क व सुरक्षित अंतर याचे भान ठेवावे यासाठी २४ वॉर्डांमध्ये २५०० मार्शलची नियुक्ती करण्यात आली असून मास्क न वापरणाऱ्या किमान २० हजार लोकांवर दंडात्मक कारवाई रोज केली जाईल असे ‘लोकसत्ता’शी बोलताना आयुक्त चहल यांनी सांगितले. या कारवाईचा आढावा आपण स्वत: रोज सायंकाळी घेणार असून मुंबई खुली होत असताना जे नागरिक नियम पाळणार नाहीत त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

गेले सहा महिने पालिकेचे डॉक्टर अविश्रांतपणे काम करत आहेत. आम्ही केलेल्या उपाययोजनांमुळे मृत्यूदर गेल्या महिन्याच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी कमी झाला आहे. ११ सप्टेंबरला रुग्णालयात दाखल करण्याजोगे म्हणजे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २६,६३२ एवढी होती तिचे ११ ऑक्टोबरला २२,३६९ एवढी कमी झाली आहे. रुग्ण दुपटीने प्रमाणही ५८ दिवसांवरून ६९ दिवसांपर्यंत गेले आहे. महत्वाचा भाग म्हणजे गेल्या महिन्यात रुग्ण बरे होण्याचे जे प्रमाण ७४ टक्के होते ते ऑक्टोबर महिन्यात ८५ टक्के झाले आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही रोज सात हजार चाचण्या करत होतो त्या वाढवून आता रोज १२,५०० चाचण्या करत असल्यानेच रोजची रुग्णसंख्या वाढलेली दिसते असे सांगून आयुक्त म्हणाले, रुग्णसंख्या वाढली असली तरी अॅक्टिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात बेड रिकामे आहेत. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास ११ सप्टेंबरला ४१६५ बेड रिकामे होते तर अतिदक्षता विभागात ८५ बेड रिकामे होते आज ११ अॉक्टोबरला ४९२२ बेड रिकामे असून अतिदक्षता विभागात २५७ बेड रिकामे आहेत. तुम्ही लक्षात घ्या आम्ही चाचण्यांचे प्रमाण गेल्या महिन्यापेक्षा दुपट्टीने वाढवले आहे. त्यानंतरही लक्षणे असलेल्या करोना रुग्णांची संख्या वाढलेली नाही. त्यामुळेच रुग्णालयात बेड रिकामे राहाण्याचे प्रमाणही वाढले आहे.
राज्य टास्क फोर्सने केलेल्या टिकेबाबात स्पष्ट नाराजी व्यक्त करून आयुक्त म्हणाले, पालिकेचे कर्मचारी करोनाच्या लढाईत जराही ढिले पडलेले नाही. एकाच वेळी वेगवेगळ्या आघाड्यांवर लढावे लागत असल्याने नियोजनात काही बदल करावेच लागतात. मुख्यमंत्र्यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या कामामुळे हजारो मधुमेही व उच्च रक्तदाबाचे रुग्ण नव्याने सापडले. ज्येष्ठ लोकांची वॉर्डनिहाय यादी करता आली. परिणामी मास्क न घालणाऱ्यांवर प्रभावी कारवाई कमी प्रमाणात झाली. मात्र आजपासून मास्क न घालणाऱ्या २० हजार लोकांवर कारवाई झालेली दिसेल. प्रत्येक वॉर्डात मार्शल नेमण्यात आले असून जागोजागी ते कारवाई करतील. याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, प्रत्येक वॉर्डात स्वतंत्र एजन्सी नेमण्यात आली असून जवळपास अडीच हजार मार्शल मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करतील.
टास्क फोर्सने किमान २५ हजार चाचण्या रोज करण्याची शिफारस केली असली तरी मुंबईसह संपूर्ण एमएमआर रिजनसाठी २४ प्रयोगशाळा आहेत. त्यांची चाचण्यांची क्षमता २० हजार असून यातील मुंबईच्या १० हजार चाचण्या ते रोज करतात तर उर्वरित आठ महापालिकांत १० हजार चाचण्या होऊ शकतात. अशावेळी आरटीपीसीआरच्या २५ हजार चाचण्या कशा करायच्या ते टास्क फोर्सने आम्हाला सांगावे, असा टोलाही आयुक्त चहल यांनी लगावला. अॅन्टिजेन चाचण्यांचे निकाल हे बरेचवेळा योग्य येत नाही हे तज्ज्ञांचेच म्हणणे आहे. त्यामुळे अॅन्टिजेन चाचण्या वाढवून रुग्ण दरवाढीचा वेग १८ वरून १० वर खाली आणून स्वत: ची खोटी पाठ थोपटून घेणे मला मान्य नाही, असेही आयुक्त म्हणाले. मुंबईची आम्ही सर्वार्थाने काळजी घेत असून मुंबईची करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही आयुक्त चहल यांनी ठामपणे सांगितले.

Leave a comment

0.0/5