कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली विरोधात पोलिसांचे समन्स
अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकवेळा अडचणीत आलेल्या आहेत. त्यात सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कंगनाने मुंबई पोलीस आणि मुंबई विरोधात वादग्रस्त वक्तव्य करत नवा वाद अंगावर ओढावून घेतला होता.
त्यातच आता कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोली हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिच्या बहिणीला समन्स बजावले आहे. दाखल गुन्ह्यात कंगनाला सोमवार दि. २६ ऑक्टोबर रोजी तर रंगोली हिला मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे.
दरम्यान हिंदू आणि मुस्लिम या दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण होईल आणि जातीय सलोखा बिघडेल अशा हेतून वारंवार ट्विट करत असल्याचा आरोपही तिच्यावर लावण्यात आलेला आहे. याच कृत्यामुळे एफआयआर नोंदवण्याचे निर्देश वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी दिले होते.
बॉलीवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावरअली सय्यद यांनी रवीश जमींदार यांच्यामार्फत दंडाधिकारी न्यायालयात खासगी तक्रार दिली असता त्यावर हे आदेश दिले गेले होते. न्यायाधीश जयदेव घुले यांनी सर्व ट्वीट्स पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी दखलपात्र गुन्हा दिसत असल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांना एफआयआर नोंदवण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार त्याच दिवशी कंगना व रंगोली यांच्याविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.