Skip to content Skip to footer

मुंबईत वाहन खरेदीत वाढ

दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांचा प्रतिसाद

दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईत वाहन खरेदीत वाढ झाली आहे. मुंबईतील ताडदेव, अंधेरी, वडाळा आरटीओत गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन नोंदणी अधिक झाली आहे. फक्त बोरिवली आरटीओत वाहन नोंदणी कमी झाली. चारही आरटीओत मिळून ५९९ वाहनांची नोंद झाली असून दुचाकींना अधिक पसंती दिली आहे.

वाहन खरेदीसाठी गुढीपाडवा, दसरा, दिवाळीचा मुहूर्त साधला जातो. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. गेल्या वर्षी ८ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील ताडदेव, वडाळा, अंधेरी, बोरीवली आरटीओत २९८ वाहनांची नोंद झाली होती. २०१८ शी तुलना करता गेल्या वर्षी वाहन खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली होती. यंदा मात्र वाहन खरेदी तेजीत असल्याचे दिसते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी प्रवासासाठी स्वत:चे वाहन घेण्याचाच निर्णय घेतल्याचा अंदाज आरटीओतील अधिकारी व्यक्त करतात. सार्वजनिक वाहतुकीतील वाहनांना असलेली गर्दी आणि दिवसभरासाठी भाडय़ाने घेतलेल्या वाहनांचे दर पाहता स्वत:चे वाहन खरेदी करण्याकडे कल आहे.

दसऱ्याच्या मुहूर्तावर वडाळा आरटीओत यंदा १७० वाहनांची नोंद झाली आहे. यामध्ये १२७ दुचाकी व ५३ चारचाकी वाहने आहे. गेल्या वर्षी ३८ दुचाकी व चारचाकी चार वाहनांची नोंद झाली होती. अंधेरी आरटीओतही दुचाकी १५० आणि चारचाकी ९१ वाहनांची नोंद अशा २४१ वाहनांची नोंद झाली असून २०१९ मध्ये १११ दुचाकी आणि ८१ चारचाकी वाहनांची खरेदी  झाली. ताडदेव आरटीओही यात मागे राहिलेले नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १६० दुचाकी, चारचाकी वाहनांची नोंदणी होतानाच यामध्ये १०६ दुचाकी असल्याचे सांगितले. २०१९ मध्ये फक्त ४१ वाहनांची नोंद होती. बोरिवली आरटीओतील वाहन नोंदणी मात्र कमी झाली आहे. २०१९ मध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर १९४ वाहन नोंदणी झालेली असताना यंदा ती घसरून २८ झाली आहे. के वळ २१ दुचाकी व ७ चारचाकी वाहने आहेत.

खरेदी किती? : मुंबईत दसऱ्याच्या दिवशी ५९९ वाहनांची खरेदी झालेली असून यामध्ये ४०४ दुचाकी, तर २०५ चारचाकी वाहने आहेत. वाहन खरेदी वाढल्यामुळे दोन कोटींपेक्षा अधिक महसूल आरटीओला मिळाला आहे.

Leave a comment

0.0/5