कोरोना काळात मदत करणाऱ्या हॉटेल व्यवसायिकांना मालमत्ता करात मनपाने दिली सवलत
मुंबई कोविड- १९च्या संकट काळात सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्स, नर्स, रुग्ण आणि आरोग्य सेवकांची राहण्याची व्यवस्था मुंबईतील अनेक पंचतारांकित खाजगी हॉटेल्समध्ये करण्यात आली होती. त्यामुळे या हॉटेल व्यावसायिकांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
मुंबईत कोरोना काळात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे रुग्णालयाची जागा अपुरी पडू लागली होती. त्यावेळेस मुंबईतील १८२ हॉटेल मुंबई मनपाकडून ताब्यात घेऊन डॉक्टर, नर्स आणि रुग्णाची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचे भाडे पालिकेने हॉटेल मालकांना दिले होते. तसेच आता मालमत्ता करात सुद्धा हॉटेल व्यवसायिकांना सवलत देण्यात आलेली आहे.
बुधवारी हा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला असता, सभागृहनेत्या विशाखा राऊत व सर्व पक्षीय गटनेत्यांनी विरोध केला. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासन हा प्रस्ताव मागे घेईल, असे वाटले होते. मात्र, हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.