Skip to content Skip to footer

वाहन चालकांना मुंबई पोलिसांचा इशारा, ‘नाइट कर्फ्यु’दरम्यान रस्त्यावर गाडी चालवताना दिसल्यास…

संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज…

ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकारामुळे सर्वत्र खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात मंगळवारपासून ५ जानेवारीपर्यंत मुंबईसह सर्व महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. संचारबंदीच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी मुंबई पोलिसही सज्ज आहेत. रात्री एखादी व्यक्ती विनाकारण वाहन फिरवताना आढळल्यास मुंबई पोलिसांकडून त्या व्यक्तीचं वाहन जप्त केलं जाणार आहे.

रात्री ११ ते सकाळी सहा यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्या व्यक्तीचं वाहन जप्त केलं जाईल . अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर मात्र ही कारवाई होणार नाही, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. “रात्रीच्या संचारबंदी आदेशाचं कठोर पालन केलं जाईल… रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवली जाईल. नाकाबंदीमध्येही वाढ केली जाईल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वगळता रात्री ११ ते पहाटे ६ यादरम्यान रस्त्यावर कोणी गाडीवर फिरताना दिसल्यास त्याचं वाहन जप्त केलं जाईल. नागरिकांनी रात्री रस्त्यावर येऊ नये आणि घरातूनच नववर्षाचं स्वागत करावं”, असं मुंबई पोलीस उपायुक्त एस. चैतन्य म्हणाले.

दरम्यान, राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार आहे.

Leave a comment

0.0/5