मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री शहरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी एकूण 578 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निगडी-प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने 578 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सभास्थानी व बजाज कंपनीच्या हॅलीपॅडवर पोलिसांची बंदोबस्तासाठी रंगीत तालीम घेण्यात आली. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री शहरात येणार आहेत. यावेळी पोलिसांनी शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जागोजागी बंदोबस्त तैनात केला आहे.
मुख्यमंत्री दौऱ्यात कायदा आणि सुरक्षा राखण्यासाठी पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त तसेच तीन पोलीस उपायुक्त, 3 सहायक पोलीस आयुक्त, 26 पोलीस निरीक्षक, 62 सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, व 578 कर्माचारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यामध्ये155 पोलीस वाहतूक व्यवस्था चोख ठेवणार आहेत.
यावेळी अधिकची कुमकही पुणे आयुक्तालयाकडून मागण्यात आली असून पोलीस पूर्णपणे मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी सज्ज झाले आहेत. यावेळी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे देखील शनिवारी शहरात असल्यामुळे पोलिसांना त्यांच्या सभास्थानी देखील बंदोबस्त करावा लागणार आहे. यावेळी दोन्ही मोठे नेते व त्यांच्या सभा यांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध मनुष्यबळावरच पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागणार आहे.