Skip to content Skip to footer

नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला रियल लाइफचा आधार

पिंपरी : चिंचवड येथील केएसबी चौकात २५ मे या दिवशी एक तरुण रात्रीच्या वेळी रस्त्यावर डोके आपटत होता. येथूनच हवालदार रवींद्र खाडे गस्त घालत असताना त्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी वेळीच हस्तक्षेप करत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. बेवारस दाखल केलेल्या रुग्णाच्या आयुष्याचा खडतर प्रवास रियल लाइफ रियल पीपल या संस्थेमुळे उलगडला.

संदीप कांबळे हा युवक मूळचा परभणीचा. गावाकडे आई, पत्नी आणि एक मुलगा, मुलगी असा सुखी परिवार. तिथे एका हॉटेलमध्ये तो वेटरची नोकरी करत होता. मात्र ते काम गेल्यानंतर त्याच्या कुटुंबाला उतरती कळा लागली. दोन भाऊ मुंबईमध्ये चांगल्या नोकरीस आहेत. मात्र त्यांचाही काही हातभार लागेना. गावामध्ये दुष्काळाची परिस्थिती असल्याने रोजंदारीचेही काही काम मिळेना. लेकरांची होत असलेली वाताहत थांबावी यासाठी त्याने शहरात जाऊन काहीतरी कामधंदा शोधण्याचा निर्णय घेतला. अवघे एक हजार रुपये घेऊन हा तरुण कामासाठी पुण्यात आला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

शहरात आल्यानंतर हा युवक काम शोधू लागला. भोसरी, चिंचवड, तळवडे या परिसरामध्ये कामासाठी कंपन्या फिरू लागला. खिशातले एक हजार रुपये संपत आले होते. काम मिळाले नाही तर आता खायचे काय हा प्रश्न त्याच्या पुढे होता. शोधूनही काम मिळत नसल्याने दोन लहानग्या लेकरांच्या आठवणीने तो व्याकूळ झाला होता. मी माझ्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही हा विचार त्याला नैराश्येत घेऊन जात होता.
याच नैराश्यातून उरलेल्या शंभर रुपयात त्याने मद्यप्राशन केले. त्या धुंदीमध्ये केएसबी चौकात स्वत:ला संपवण्याच्या हेतूने रस्त्यावर जोर-जोरात डोके आपटू लागला. त्यांने केलेला आत्महत्येचा प्रयत्न इतका भयंकर होता, की यामध्ये त्याला अपंगत्व आले. वायसीएममध्ये दाखल केल्यानंतर रिअल लाइफ, रिअल पीपल या संस्थेचे अध्यक्ष एम. ए. हुसैन, महादेव बोत्रे, आकाश शिरसाट, मंगेश सरकटे, कर्मचारी मिलिंद माळी, दत्ता वाघमारे यांनी त्या तरुणाची देखभाल केली. एक महिना तरुणाची सेवा करत त्याला अपंगत्वातून बाहेर काढले. रुग्णालयातून सोडल्यावर सर्व प्रकारची मदत करत त्या तरुणाला त्याच्या गावी सुखरूप पाठवले.

Leave a comment

0.0/5