पिंपरीत मेट्रो रुळावर

मेट्रो | On the Pimpri Metro Route

पुणे महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी मेट्रो सिद्ध झाली असून सोमवारी (३० डिसेंबर) पिंपरीत संत तुकारामनगर येथे मेट्रोचे डबे रुळावर ठेवण्यात आले. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. बहुचर्चित मेट्रोतून प्रवास करण्याची मोठी उत्सुकता आतापासूनच शहरवासीयांमध्ये दिसून येत आहे.

नागपूरहून पाठवण्यात आलेले मेट्रोचे काही डबे रविवारी शहरात दाखल झाले. त्या डब्यांचे ढोलताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळीच मोठय़ा क्रेनच्या सहाय्याने हे डबे पुलावर चढवण्यात आले. त्यानंतर ते रुळावर ठेववण्यात आले.

मेट्रोसाठी बांधण्यात आलेल्या पुलावर दोन मार्गिका आहेत. त्यापैकी एका मार्गिकेवर हे डबे ठेवून एकमेकांना जोडण्यात आले. त्यानंतर धिम्या गतीने ते चालवून पाहण्यात आले. बराच वेळ ही प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, मेट्रोचे डबे पुलावर घेत असताना महामार्गावरील पिंपरीतून पुढे जाणारी वाहतूक काही काळासाठी वळवण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली. मात्र, दुपारनंतर रस्ते पूर्ववत खुले करण्यात आले.
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर मेट्रो धावणार असून इतर भागाच्या तुलनेत येथील काम वेगाने सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यात पिंपरी पालिका मुख्यालय ते निगडी भक्ती-शक्ती शिल्पसमूह या दरम्यान मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. महापालिका सभेने त्यास मंजुरी दिली असून पुढील मान्यतेसाठी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. सध्या मेट्रोचे स्लॅप टाकण्याचे काम डाई-इची कंपनीपर्यंत आले आहे. नाशिकफाटा (कासारवाडी) पुलावर जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर पहिल्या टप्यातील चाचपणी केली जाणार असल्याचे मेट्रोकडून सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here