पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लॉकडाउनची तयारी पूर्ण; नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन

पिंपरी-चिंचवड पोलिसांक-Pimpri-Chinchwad Police Station

पिंपरी-चिंचवड शहरात आज मध्यरात्रीपासून दहा दिवसांचा लॉकडाउन असणार आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विविध भागात पथसंचलन केले. शहरातील पोलीस पुन्हा एकदा लॉकडाउनसाठी सज्ज असल्याचे या निमित्ताने दिसून आले.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून शहरातील बाधित रुग्णांची संख्येने ७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत असलेली रुग्ण संख्या पाहता आज सोमवारी मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, व्यवसाय चार दिवस पूर्णतः बंद असणार आहेत. तर दहा दिवस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रात संचार बंदी लागू असून खासगी वाहनबंदी असणार आहे, असे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिले.

मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये करोना विषाणूने शिरकाव केला होता. त्यानंतर शहरातील संख्या आटोक्यात येत नसल्याचे वारंवार दिसले आहे. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मध्यरात्रीपासून लॉकडाउन लागू होणार आहे. पहिले चार दिवस लॉकडाउन हे अत्यंत कडक आहे. त्याचीच पूर्वतयारी म्हणून आज सायंकाळी पोलीस आयुक्तालयातील देहूरोड आणि सांगवी पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पथसंचलन केल्याचं पहायला मिळालं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here