Skip to content Skip to footer

लोणावळ्यातील भुशी डॅम वीकेंडला संध्याकाळी बंद

Lonavala bhushi damपुणे : पावसाळी वीकेंड म्हटला, की पर्यटकांची पावलं आपसूकच धरणं आणि धबधब्यांकडे वळतात. लोणावळ्यातील भुशी डॅम तर एकदम हॉट डेस्टिनेशन. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी भुशी डॅमकडे जाणारा रस्ता शनिवार-रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्यात येणार आहे.

भुशी धरण आणि लायन्स पॉईंट परिसरात शनिवार-रविवार आणि सलग सुट्टयांच्या काळात पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होते. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणासाठी भुशी डॅम आणि लायन्स पॉईंटकडे जाणारा मार्ग संध्याकाळी पाच वाजल्यानंतर बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.

भुशी धरण आणि लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे पाच ते सहा किमी अंतरापर्यंत ट्राफिक जाम असतो. त्यामुळे पर्यटकांना तास-तासभर या वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागतं. या परिसरात पायी येणाऱ्या पर्यटकांनाही रस्त्यावरुन चालणं कठीण होतं. ट्रक, टेम्पो, बस, मिनी बस यासारख्या अवजड वाहनांना दरवर्षीप्रमाणेच शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवसात शहरात प्रवेश बंदी असेल.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. भुशी धरण आणि लायन्स पॉईंटसह भाजे, लोहगड, गिधाड तलाव ही सर्व पर्यटनस्थळंही संध्याकाळी सहा वाजल्यानंतर पर्यटकांसाठी बंद केली जाणार आहेत.

पर्यटकांनी पर्यटनस्थळांवर वर्षासहलीचा आनंद घेताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. महिलांची छेडछाड, अश्लील शेरेबाजी, सार्वजनिक ठिकाणी हुल्लडबाजी, धांगडधिंगा, मद्यपान किंवा हुक्का ओढताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

यापूर्वीच ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघरमध्ये धरण आणि धबधब्यांवर पावसाळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटनाचा आनंद घेताना अतिउत्साहात घडणारे अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे

via अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5