पुणे: पुण्यातल्या चाकणमध्ये सोमवारी मराठा क्रांती मोर्चा च्या बंद दरम्यान जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे चाकणमधली जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरुन आलेल्या लोकांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. असंख्य बसेस आणि खासगी वाहनांची काल तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.
जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. काही नावं निष्पन्न झाली असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे इतर नावं निष्पन्न करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख स्थानिकांच्या मदतीने पटवून आज अटकसत्र सुरु करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं.
पुणे-नाशिक हायवेवर जवळपास 30 बस आणि ट्रकची जाळपोळ केली. तर शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड केली. चाकणजवळ काल सकाली दहाच्या सुमारास आंदोलन सुरु होतं. आधी दोन तास आंदोलन शांततेत सुरु होतं, त्यानंतर तोडफोडीला सुरुवात झाली. त्यामुळे या आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा संशय आहे.
चाकण कोणी पेटवलं
चाकण येथील मराठा क्रांती मोर्चा नेमका कोणामुळं हिंसक झाला, यासाठी पोलिसांनी व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ जमवण्यास सुरुवात केली आहे. या फोटो आणि व्हिडीओचा आधार घेत कारवाई केली जाणार आहे. यासाठी दोन पोलीस निरीक्षकांचे नंबर देण्यात आले असून, व्हाट्सअपवर व्हिडीओ पाठवणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे.
चाकणमध्ये आंदोलकांनी पंचवीस ते तीस बसेस जाळल्या. तसंच अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल चाकण, देवाची आळंदी आणि खेडमध्ये बंद पाळण्यात आला.
आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या.