Skip to content Skip to footer

सर्वांची संमती, मग मराठा आरक्षण अडलंय कुठं?: उदयनराजे

पुणे: मराठा आरक्षण बाबत कोणाचाही विरोध नाही तर मग इतकी वर्ष हा प्रश्न का सुटला नाही ? 58 मूक मोर्चे निघाले पण तरीही मराठा आरक्षण लांबवलं. त्याचवेळी तातडीने पावलं उचलली असती, तर आज अनेकांचे जीव गेले नसते, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दुसऱ्या कोणत्या समाजाचं आरक्षण काढून घ्या असं आम्ही म्हणत नाही. मात्र मराठा, धनगर समाजातील जनतेलाही न्याय मिळावा, असं उदयनराजे म्हणाले.

मराठा मोर्चे थांबले पाहिजेत म्हणता, मग मार्ग का काढत नाही? लोकांसमोर पर्याय नसल्यानेच आजचे मोर्चे आहेत. सत्ताधारी-राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी. नाहीतर आरक्षण लांबणार आहे किंवा देणार नाही, असं तरी एकदा सांगून टाका, अशी उद्विग्न प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली.

पुढची 30 वर्ष मराठा आरक्षण मिळणार नाही, अशी घोषणा तरी करुन टाका, असा उपहासात्मक टोला उदयनराजे भोसलेंनी लगावला.

मराठा आरक्षणाच्या प्रश्नाला कोणत्याही अन्य मुद्द्याशी जोडू नका, ना राजकारण, ना अन्य समाजाशी तुलना नको, असं ते म्हणाले.

आंदोलन करणाऱ्या मोर्चेकऱ्यांना मिळतं काय ? दरोडा, खुनाच्या केसेस. सरकारने मराठा आंदोलकांवरील केस तातडीने मागे घ्याव्यात, अन्यथा त्याचा भडका होईल, परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजावर आज जी वेळ आली आहे, त्यामुळेच आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. वेळीच प्रश्न मार्गी लागले असते तर अनेकांचे जीव गेले नसते. कायदे कोणी बनवले ? माणसानेच ना ? मग लोकशाहीतील लोकांसाठी घटना वगैरे कशाला पाहता ? मराठा समाजावर अन्याय होतोय तर त्यांना आरक्षण द्यायला हवं, असं उदयनराजे म्हणाले.

ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, त्याची जाणीव प्रत्येक प्रतिनिधींना असायला हवी, असा सल्ला त्यांनी राजकारण्यांना दिला.

जी तत्परता अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वपक्षांनी दाखवली, तिच तत्परात मराठा आरक्षणाबाबत का नाही ? सर्वांची संमती आहे तर मग मराठा आरक्षणाला विलंब का ? असे सवाल उदयनराजेंनी उपस्थित केले.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5