पुणे : मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, मराठा आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत पुण्यात आज मराठा आरक्षण परिषद पार पडली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे 100 समन्वयक उपस्थित होते. मराठा मोर्चाची पुढील दिशा काय असेल, यावर या परिषदेत मंथन झालं.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या सूचनांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहे. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईल, मात्र आत्महत्या किंवा तोडफोड करु नका, असे आवाहन खासदार उदयनराजेंनी यावेळी केले.
आजी-माजी सरकारने दुर्लक्ष केल्याने आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून, सोयीच्या राजकारणामुळे आजपर्यंत आरक्षणासाठी बळी गेले, असा आरोप उदयनराजेंनी केला.
सर्व राज्यकर्त्यांना माझी कळकळीची विनंती, आरक्षणावर ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, असे म्हणताना उदयनराजे पुढे म्हणाले, “आरक्षणावरुन सरकारची संगीत खुर्ची कधी थांबणार? मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की नाही, ते एकदाचं सरकारने स्पष्ट सांगून टाकावं. आरक्षणासाठी सरकारने कागदी घोडे नाचवू नये. मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका. मराठा आरक्षणावर मार्ग काढा, अन्यथा अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही.”