देशभर साजऱ्या होणाऱ्या ‘बकरी ईद’ च्या निमित्ताने कुर्बानीसाठी खरेदीकरिता होणाऱ्या खर्चाला कात्री लावावी आणि हा निधी केरळमधील पूरग्रस्त बांधवांना हस्तांतरित करण्याचे आवाहन वारजे येथील एक मुस्लिम तरुण करीत आहे. त्याच्या या आवाहनाला चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.
वारजे येथे राहणाऱ्या पैगंबर शेख याने आपल्या फेसबुक वॉलवरून लाईव्ह व्हिडीओद्वारे यंदा ईदच्या कुर्बानीसाठी जे लोक खर्च करतात त्यांनी केरळमध्ये अडकलेल्या पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केल होत. आणि मुस्लिम बांधवांनी देखील पैगंबरच्या आवाहनाला साद देत केरळवासियांसाठी मदतीचा ओघ सुरु केला आहे. त्यातून मागील अवघ्या २४ तासांत सुमारे २५ हजार रुपये या तरुणाने जमादेखील केले आहेत.
‘बकरी ईद’ साठी कुर्बानीसाठी काही नागरिक खर्च करीत असतात. यासाठी मोठा व विशेष बोकड खरेदी करण्याच्या पवित्रा अनेक जणांचा असतो. अल्लाह् हा फक्त आपली नियत व भावना पाहत असतो. आपण केवळ पाहत न राहता या कठीण काळात मदत केली पाहिजे. यासाठी फक्त मुस्लिमच नाही, तर सर्व धर्मीय बंधू-भगिनींना त्याने आवाहन केले आहे. त्याच्या आवाहनाला सर्व समाजातून प्रतिसाद मिळत आहे. निधी हस्तांतरित केल्यावर त्याचा स्क्रीनशॉट आपल्या फेसबुक पेजवर प्रसारित करण्याचे आवाहनदेखील त्याने केले आहे. ज्याने इतरांना अशी मदत करण्यास चालना मिळेल.
पैगंबर शेख हा तरुण छत्रपती शिवरायांचा कट्टर समर्थक असून अनेक सामाजिक कार्यात तो अग्रेसर असतो. त्याने गेल्याच आठवड्यात संविधान सन्मान सभेत सहभागी होण्याच्या केलेल्या आवाहनालादेखील खूप प्रतिसाद मिळाला होता. तो स्वत:देखील या सभेत सामील झाला होता. अर्थातच काय तर देशात बिघडलेल्या सामाजिक स्वास्थ्यामध्ये पैगंबर शेख हा तरुण आपल्या सगळ्यांसमोर एक नवा आदर्श घालून देत आहे.