गणेशोत्सवासाठी ऑनलाईन परवाना घेण्यासाठी 347 मंडळांनी पुणे महापालिकेकडे ऑनलाईन अर्ज केले आहेत. www.punepolice.co.in/online-parwana या संकेतस्थळावर अर्ज करायचे आहेत.
यापूर्वी गणेशोत्सवासाठी पोलीस आणि महापालिकेकडून परवानगी घेण्यासाठी महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ‘एक खिडकी’ योजना राबवली जात होती. अनेक वेळा कागदपत्रांची व्यवस्थित तपासणी करणेही शक्य होत नव्हते. गेल्या दोन वर्षापासून ऑनलाईन करण्याची पद्धत कार्यान्वित करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कार्यकर्त्यांचे महापालिका आणि पोलिसांकडून परवानगी घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उच्च न्यायालयाने तयार केलेली नियमावली लक्षात घेऊन वाहतूक कोंडी होणार नाही खड्डे पडणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागते.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तो वाहतूक विभागाकडे जाईल वाहतूक शाखेची परवानगी मिळाल्यानंतर तो अर्ज महापालिकेकडे जाईल महापालिकेने अर्ज मंजूर केल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकारी सर्व बाबी तपासून अर्ज मंजूर करून मंडळाला परवाना देत आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी किमान दोन दिवसांचा कालावधी लागत आहे.
संकेतस्थळावर लॉग इन करताना मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो तो ओटीपी टाकल्यानंतर अर्जावर अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांच्यासह इतर पदाधिकारी यांची नावे, ईमेल आयडी ,फोटो अपलोड करावे लागतात. धर्मादाय आयुक्तांचा नोंदणी क्रमांक, गेल्या वर्षाचे महापालिकेचा आणि पोलिसांचा परवाना क्रमांक, ‘ना हरकत’ प्रमाणपत्र सादर करावे लागते.