पुणे – लाल रंग आणि गोड चवीचे किन्नूर सफरचंद हिमाचल प्रदेश येथून मार्केट यार्डात दाखल झाले आहे. परदेशी सफरचंदाच्या तोडीस तोड असलेल्या या सफरचंदाने पुणेकरांना भुरळ घातली आहे. या सफरचंदाची मागणी वाढली आहे. सध्या येथील घाऊक बाजारात दररोज 2200 पेटी सफरचंद दाखल होत आहे. त्यास प्रती दहा किलोस दर्जानुसार 1 हजार ते 1 हजार 400 रुपये भाव मिळत आहे.
भारत-चीन सीमारेषेलगतच्या गावांमधून बाजारात दाखल होत असलेल्या या सफरचंदाला शहर तसेच उपनगरांतील स्टॉलधारक तसेच मॉलवाल्यांकडून मोठी मागणी आहे. याबाबत बोलताना व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, हिमाचल प्रदेश मधील ताबो, चांगो या गावांमधून किन्नूर बाजारात विक्रीसाठी येत आहे. भारत-चीन सीमेलगतच्या गावांमधून ट्रकद्वारे येथील फळबाजारात दाखल होणाऱ्या या फळाचा हंगाम साधारणत: महिनाभर असतो.
यंदाच्या पिकास पोषक वातावरण राहिल्याने फळांचा दर्जा तसेच गोडी चांगली आहे. तसेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत बाजारात आवकही चांगल्या प्रमाणात होत आहे. इतर सफरचंदाच्या तुलनेत हे थोडेसे महागडे आहे. तरीही चव उत्तम असल्याने या फळाची स्टॉलधारक, मॉलवाल्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास येत आहे. परदेशी सफरचंद ही शीतगृहात जास्त काळ ठेवली जातात. त्यातुलनेत, देशी सफरचंद हे तोडणी करून फळबाजारात विक्रीसाठी पाठविली जातात. त्यामुळे, प्रक्रिया केलेल्या फळांपेक्षा ताजी फळे खाणे आरोग्यास फायदेशीर असून देशामध्ये उत्पादीत होणाऱ्या सफरचंदामध्ये हे सफरचंद अधिक आकर्षक आणि खाण्यास चांगले आहे. मार्केट यार्डातील फळ विभागात गेल्या दहा दिवसांपासून या सफरचंदाची बाजारात आवक होत आहे. आवके बरोबर मागणीही चांगली असल्याने या फळाच्या प्रति दहा किलोच्या पेटीस दर्जानुसार 1 हजार ते 1 हजार 400 रुपयांनी विक्री करण्यात येत आहे.