पुणे म्हटलं की प्रत्येकाला आपल्या पुण्याबद्दल अभिमान, आपलेपणा वाटतोच..मग तो सदाशिव पेठेतील पक्का पुणेरी असो…की उपनगरातील पुणेकर. बदलत्या काळानुसार पुण्याने सगळयांना आपलसं केलंय. मग त्यात फक्त शिक्षण घेण्यासाठी आलेला आणि इथेच स्थायिक झालेले विद्यार्थी असो…की पोटापाण्यासाठी नोकरी धंदा करून जगणारे सर्वसामान्य नागरिक असो… शहरातील सुविधांचा लाभ घेऊन आपले जीवनमान सुधारण्याचा प्रयत्न करणारे ग्रामीण भागातील छोटीशी कुटुंब असो…. मुंबईपेक्षा पुणे बरं किंवा पुण्यापेक्षा मुंबई बरं म्हणणारे असोत…पुण्याने सगळयांना आपलंसं केलंय.
पूर्वी छोट्या छोट्या पेठांमध्ये वसलेलं पुणे केव्हा उपनगरमध्ये जाऊन वसलं ते कळलंही नसेल…त्यामुळे हे विस्तारलेले पुणे आजही अशा कित्येकांना सामावून घेण्याच्या तयारीत आहे. सारसबागेपासून सिंहगडपर्यंत…अन् तुळशीबागेपासून शनिवारवाड्यापर्यंत सर्व रस्ते तोंडपाठ असणारे पुणेकर…चितळेंच्या बाकरवडी अन् आंबाबर्फी पासून जोशींच्या वडापावपर्यंत… सुजाताच्या मस्तानीपासुन…. काटाकिररची मिसळीपर्यंत कित्येक पदार्थांवर ताव मारणारे खवय्ये पुणेकर… आख्या जगाला शहाणपण शिकविण्याचा विडा उचलणारे अन् समोरच्याला कळण्याआधी पाणउतारा करण्याची विशिष्ट शैली प्राप्त करणारे असे हे पुणेकर. जगात भारी…पुणेरी…असा माज करणाऱ्या पुणेकरांच पुण्यावर जीवापाड प्रेम आहे बरं का. त्यामुळे पूण्याबद्दल भ्र शब्दही ऐकून न घेणारे अन् मुंबईकरांशी केव्हा भिडण्यास तयार असलेल्या पुणेकरांचा आपल्या पुण्याकडे दुर्लक्ष तर होत नाही ना? जगाला पुण्याचं श्रेष्ठत्व पटवू पाहणारे पुणेकर काही विसरत तर नाही ना?
काळानुसार पुणं बदलतंय… कधी काळी पूनवडी म्हणून ओळखलं जाणारे पुणे आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जाईल. सायकल रिक्षपासून सुरू असलेला प्रवास….रिक्षा.. बस..आज मेट्रोपर्यंत येऊन पोहोचालय…..शिक्षणाचं माहेर घर…महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणं आता कित्येक क्षेत्रात छाप पाडत आहे. पण विस्तारणाऱ्या पुण्यासह…पुण्यातील प्रश्न देखील विस्तारत आहेत याची जाणीव पुणेकरांना आहे का?
आपल्या पुण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काय करतो? पुण्याने आपल्याला खूप काही दिलं पण, आपण आजपर्यंत पुण्याला काय दिलं? हा प्रश्न पुणेरीपणाचा माज करणाऱ्या प्रत्येक पुणेकरांपासून…नव्याने उदयास आलेल्या उपनगरातील प्रत्येक पुणेकरांनी स्वतः ला विचारावा. आपलं पुणे म्हणताना वाटणारा अभिमान आपल्या
पुण्याच्या वाहतूक कोंडीत अडकल्यावर वाटतो का? पुण्यातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यां ना पाहून वाटतो का? बंद पडलेल्या पुण्यातील बसला पाहून वाटतो का? नाही ना..कारण असे पुण्यात असे कित्येक न सोडवलेले प्रश्न आहेत. तसं बघायला गेलं हे सगळं तर प्रशासनाचे काम. बरोबर आहे तुमचं. आहेच हे प्रशासनाचं काम. पण, या सर्वात आपण काय करतो? प्रशासनाकडे बोट दाखवून आपण आपली जबाबदारी झटकू शकत नाही.
हे सगळं आपणच करू शकतो.आपणच आपलं पुणे घडवू शकतो. आपणच आपलं पुणे बदलू शकतो. त्यासाठी गरज आहे ती फक्त आवाज व्यक्त होण्याची. आपल्याला फक्त एवढंच करायचंय की आपल्या डोळ्यांना दिसणारे, आपल्या जाणवणारे प्रश्न आपण प्रशासनापर्यंत पोहचवू या. आपल्याला पटणाऱ्या, न पटणाऱ्या गोष्टींवर अगदी हक्कानं व्यक्त होऊ या. मग, बघा बदल कसा घडतोय ते. आपला आवाज प्रशासना पर्यंत पोहचवा. ‘सकाळ संवाद’च्या माध्यमातून….आपला आवाज प्रशासना पर्यंत पोहचु या… दिवसभर सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करणारे थोड आपल्या पुण्यासाठी काहीतरी लिहू या..!
चला, तर पण मग आपलं पुणे आपण घडवूया #WeCareForPune हे दाखवून देऊ या. पुण्याच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे पुणेकरांच ‘सकाळ’ने सुरू केलेल्या #WeCareForPune उपक्रमात सहभागी होऊ या. आपल्या पुण्यासाठी थोड व्यक्त होऊ या.