पुणे – शिवाजीनगर न्यायालयाजवळील कामगार पुतळ्याजवळ गुरूवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पाहणी केली. मात्र, घटनास्थळी रिकामी रिकाम्या पुंगळ्या किंवा गोळीबार झाल्याचा ठोस पुरावा पोलिसांच्या हाती आला नाही.
सिद्धेश्वर शर्मा (वय 21, रा.देहूरोड) व त्याचा साथीदार न्यायालयीन कामासाठी शिवाजीनगर येथे आले होते. दोघेजण दुपारी 2 वाजता न्यायालयाचे प्रवेशद्वार क्रमांक 3 व कामगार पुतळादरम्यानच्या रस्त्यावरुन येत असताना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी पिस्तूलातून त्यांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, शर्मा व त्याच्या मित्राला गोळी लागली नाही. या घटनेनंतर शर्माने पोलिसांना खबर दिली. या घटनेनंतर परिमंडळ-1 चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलिस आयुक्त समीर शेख, सुधाकर यादव, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यावेळी तेथे पिस्तूलातून उडालेल्या गोळीची पुंगळी किंवा अन्य कोणताही पुरावा आढळला नाही.
पोलिसांनी या गोळीबाराबाबत स्थानिक रहीवासी, रिक्षाचालक, दुकानदार यांच्याकडे कसून चौकशी केली. मात्र अशा प्रकारचा कोणताही गोळीबार झाला नसल्याचे लोकांनी सांगितले. त्यामुळे खरोखरच गोळीबार झाला होता का ? याविषयी दिवसभर चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून त्यादृष्टीने तपास करण्यास सुरूवात केली.