देहुरोड – मुंबई-पुणे महामार्गावर सोमाटणे येथे महामार्गालगत बेकायदेशीरपणे उभ्या राहणाऱ्या अवजड वाहनांनी टोलनाक्याला घेरले आहे. या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.
भाजपा प्रणित नव भारतीय शिव वाहतूक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सागर लांगे यांनी प्रादेशिक परिवहनचे उपायुक्त आनंद पाटील यांना निवेदन देत या समस्येकडे लक्ष वेधले. मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे टोल नाक्याजवळ मोठ-मोठे व्यावसायिक गोडाऊन उभारण्यात आलेले आहेत. या ठिकाणी अवजड वाहने, कंटेनर रस्त्यांच्या कडेला उभे असतात. या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच रात्रीच्या वेळी या वाहनांना इतर वाहने धडकून अपघात होत आहेत.
या वाहनांमुळे वळण मार्गावरुन येणाऱ्या इतर वाहनांना पुढील वाहने दिसत नाहीत. यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहे. तर कित्येकजणांना अपंगत्व आले आहेत. या वाहनांवरील चालक, क्लिनर तसेच अन्य कामगारांचा महामार्गालगत धोकादायक पद्धतीने वावर असतो. या वाहनांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. संघटनेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कासिम बागवान, इमरान बेग, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष सरवर आली आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन विशाल बराठे, अनुप शुक्ला, इलियास शेख, तौसिफ शेख, असलम खान आदींच्या उपस्थितीत देण्यात आले.