उष्णतेच्या लाटेमुळे महाराष्ट्र भाजून निघाला असून पुढील तीन दिवस ही परिस्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाड्याला सर्वाधिक झळ बसली आहे. पश्चिम महाराष्ट्रही भाजून निघाला आहे. मुंबईकरदेखील यातून सुटले नसून उन्हाचा चटका आणि घामाच्या धारांनी हाल झाले.
राज्यातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशानी वाढला आहे. मंगळवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक ४७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात नाशिकचा अपवाद वगळता सरासरी ३ ते ६ अंशांनी वाढ झाली आहे. विदर्भात बुलडाणा वगळता इतर जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंशाच्या पुढे गेले आहे. उत्तरेकडून येणारे उष्ण कोरडे वारे, मान्सूनची खोळंबलेली प्रगती, राज्याच्या माथ्यावर असलेला सूर्य यामुळे राज्यभरातील कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे हवामान तज्ज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या चार ते पाच वर्र्षांत प्रथमच मे अखेरीस तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अंदमानामधे २० मेच्या सुमारास मान्सूनने हजेरी लावली. मात्र, अनुकूल वातावरण नसल्याने पुढील वाटचाल रेंगळली आहे. साधारण १५ मे नंतर कमाल तापमानात घट होत असते. मात्र, तापमानात घट होण्याऐवजी सूर्य पुन्हा आग ओकू लागल्याचे चित्र राज्यात दिसून येत आहे.
>राज्यावर जास्त दाबाचा पट्टा असल्याने जमिनी लगतची गरम हवा वर जात नाही. त्यामुळे विदर्भासह राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ नोंदविण्यात येत आहे. पुढील तीन दिवस अशीच स्थिती राहील.
-अरविंद श्रीवास्तव, प्रमुख, जलवायू संशोधन-हवामान विभाग