पुणे ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या दख्खनच्या राणीचा अर्थात डेक्कन क्वीनचा ९०वा वाढदिवस पुणे स्टेशनवर धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण गाडीला सजावट करण्यात आली होती. रेल्वे स्टेशन म्हटले की असणारी गर्दी, बॅग घेऊन प्लॅटफॉर्मवर गाडी पकडण्यासाठी धावपळ करणारे प्रवासी, आई वडिलांचा हात सोडून पाळणारी लहान मुले असे पारंपरिक दृश्य असते. पण आज पुण्यात मात्र सजवलेली दख्खनची राणी, तिच्या समोर केक, उत्साहाने काठाच्या साड्या आणि पारंपरिक दागिने घालून आलेल्या महिला असे जणू एखाद्या सणासारखे वातावरण होते. प्रवाशांच्या लाडक्या दख्खनच्या राणीच्या वाढदिवसाचा जल्लोष सुरु होता.
त्यातच रेल्वेचे बँड पथक ‘जय जय महाराष्ट्र माझा’ची धून वाजवत वातावरण प्रफुल्लित करत होते. अतिशय घरगुती वाटावे अशा वातावरणात एखाद्या व्यक्तीचा नव्हे तर रेल्वेचा वाढदिवस साजरा करण्याची ही परंपरा पुण्यात वर्षानुवर्षे पाळली जाते. यंदा तर मुंबई ते पुणे असा प्रवास करणार्यांच्या मनात रुजलेले पारंपरिक पांढरा आणि निळा रंग त्याजोडीला लाल पट्टी असे रूप कायम ठेवून अत्याधुनिक ‘एलएचबी’ कोचची जोड देखील देण्यात येणार आहे.
यावेळी प्रवासी विद्या म्हात्रे म्हणाल्या की, देख्खनच्या राणीने प्रवास करताना खूप समाधान वाटते. आम्ही दिवाळी, दसऱ्यासारखे सण एकत्रित साजरे करतो. अगदी मकर संक्रांतीचे हळदीकुंकूही करतो. अंकिता देशपांडे म्हणाल्या की, गेले २० वर्ष मी डेक्कन क्वीनने ये-जा करतो. आम्ही २०० महिला दररोज प्रवास करत असून आता आमचा ”डेक्कनच्या राण्या” नावाचा वोट्स अप ग्रुपही तयार झाला आहे. आमची फक्त एकच मागणी आहे की, गाडी थोडी लवकर सुरु करावी आणि वेळेत पोचावी.