Skip to content Skip to footer

कोथरूडमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटले ; मध्यरात्रीची घटना

कोथरूड येथील पौड रस्त्यावरील उजव्या भुसारी कॉलनीजवळ प्रवाशाला लुटण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या संदर्भात कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलीस तपास सुरु आहे. याबाबत सचिन नाईक यांनी फिर्याद दिली आहे. नाईक हे मुंबई येथून पत्नीला भेटून परतले. येताना ते चांदणी चौकात उतरले. त्यावेळी त्यांनी लोहिया जैन आय टी पार्कजवळून  एका दुचाकीस्वाराकडे लिफ्ट मागितली. संबंधित दुचाकीवर चालक आणि अजून एक व्यक्ती बसली होती मात्र तरीही त्यांनी नाईक यांना राहुल कॉम्प्लेक्सपर्यंत लिफ्ट दिली.

त्यानंतर  पाठीमागून  एका दुचाकीवरून तीन व्यक्ती आल्या आणि त्यांनी नाईक यांना कोपऱ्यात नेवून मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक सुरु झालेल्या या मारहाणीनंतर फिर्यादी गोंधळून गेले होते. त्यावेळी त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून मोबाईल, पैसे आणि मौल्यवान सामान काढून घेत पोबारा केला.  यात सुमारे ८ हजार ५०० रुपयाचा ऐवज काढून घेण्यात आला. त्यानंतर कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल  करण्यात आली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ अधिक तपास करत आहेत.
दरम्यान चांदणी चौकातून रात्री उशिरा अनेक प्रवाशांची मुंबईला ये -जा सुरु असते. यापूर्वीही धाक दाखवून लुटणारीच्या घटना तिथे घडल्या आहेत. एखादा गंभीर प्रकार होण्याची वाट न बघता चौकात एखादी पोलीस चौकी सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे

Leave a comment

0.0/5