Skip to content Skip to footer

’मोबाईल लोक अदालतीतून’ तडजोडीअंती खटले निघणार निकाली

लोकअदालतीमध्ये विविध प्रकारची दिवाणी, फौजदारी, धनादेश न वटल्याची प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचे दावे तडजोडीसाठी ठेवण्यात येतात. यात आता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या  ‘मोबाईल लोकअदालती’च्या माध्यमातून याप्रकारचे खटल्यांची तडजोड होऊन ते निकाली निघणार आहेत. जिल्हयाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन उपक्रमाच्या माध्यमातून मध्ये नागरिकांना कायदेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे.

त्याप्रमाणे विविध बँका, वित्तीय कंपन्या तसेच मोबाईल-दूरध्वनी कंपन्यांकडील दाखलपूर्व प्रकरणे, विविध शासकीय, निमशासकीय, पोलिस खात्याकडील दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणेही तडजोडीसाठी ठेवली जाणार आहेत.  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. अगरवाल यांच्या हस्ते सोमवारी जिल्हा न्यायालयात  अदालतीचे उद्घाटन करण्यात आले. गावो गावी जाऊन न्याय देता यावा, यासाठी फिरत्या लोक अदालतीच्या माध्यमातून “न्याय आपल्या दारी’ ही सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरविली जाते. 3 ते 29 जून दरम्यान जिल्हातील विविध ठिकाणी ही अदालत व शिबिर होणार आहे.  विविध कायद्यावरील माहिती, मोफत कायदेविषयक सहाय व सल्ला योजना, समुपदेशनाद्वारे प्रकरणांमध्ये समझोता तसेच गोरगरिबांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजना यांची माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांना देण्यात येणार आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव सी. पी. भागवत यांनी दिली.

* लोकअदालतीचे ठिकाण व तारीख : पौड (ता. 4), कामशेत (ता. 6), जुन्नर (ता. 10), घोडेगाव (ता. 12), पेठ (ता. 12), तळेगाव ढमढेरे (ता. 17), खडकी (ता. 19), बेलवडी (ता. 21), वानेवडी (ता. 24), सासवड (ता. 26), कुसगाव (ता. 28).
* शिबिराचे ठिकाण व तारीख : इंदोरी (ता. 7), जुन्नर (ता. 11), घोडेगाव (ता. 13), कडाची वाडी (ता. 15), विठ्ठलवाडी (ता. 18), खडकी (ता. 20), दळज नंबर 1 (ता. 22), शिरवळी (ता. 25), नारायणपूर (ता. 27), कुसगाव (ता. 29).

Leave a comment

0.0/5