Skip to content Skip to footer

आताचा भारत आक्रमणाला सडेतोड उत्तर देणारा : निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

देशातील संरक्षण दले आपआपल्या पातळीवर काम करीत असतात. व्यवस्थेच्या महत्वाच्या व्यक्तीपर्यंत निर्णय पोहचविण्यात त्यांच्यात क मालीची चुरस असते. यासगळयात मात्र वेळ जातो हे त्यांच्या लक्षात येत नाही. आतापर्यंत या पध्दतीने होणा-या या कामात बदल झाला आहे. जेव्हा आपल्यावर आक्रमण होईल तेव्हा उत्तर देऊ अशी मानसिकता असणा-या भारताची भूमिका केव्हाच बदलली आहे. आताचा भारत हा समोरच्या आक्रमणाला जशास तसे उत्तर देणारा आहे. असे मत निवृत्त एअर मार्शल व माजी हवाईदल उपप्रमुख भूषण गोखले यांनी व्यक्त केले.

विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि अविनाश थोरात लिखित  ‘अजित डोवाल गुप्तहेर ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे श्रमिक पत्रकार संघात पार पडले. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून गोखले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस महासंचालक अजित पारसनीस होते. याप्रसंगी पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट, माजी आमदार उल्हासदादा पवार, अंकुश काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे, भारत देसडला,विश्वकर्मा प्रकाशनचे मनोहर सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते.

 गोखले म्हणाले, कुणी आक्रमण केल्यानंतर मग त्यावर चर्चा आणि उत्तर असा भारत आता राहिला नाही. जशास तसे उत्तर देण्याची मानसिकता देशात रुजु लागली आहे. हे लक्षात घेण्याची गरज आहे. सध्या वेगवेगळ्या पध्दतीने दहशतवाद आपल्यासमोर येत आहे. यासगळयात सर्वाधिक प्रभाव सामाजिक माध्यमांचा आहे. त्यावर वाचक, दर्शक यांची मानसिकता बदलुन त्याला वेगळी दिशा देण्याचे काम प्रभावीपणे केले जात आहे. आगामी काळात संरक्षणाच्या दृष्टीने या सामाजिक माध्यमांना समजून घ्यावे लागणार आहे. देशाबद्द्लची विश्वसनीयता याप्रकारच्या माध्यमांतून विविध प्रकारे समोर येत असल्याचे गोखले यांनी सांगितले. लेखक थोरात यांनी यावेळी आपली पुस्तकामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले, हेरगिरी ते मुत्सदगिरीच्या प्रवासात डोवाल यांनी देशाकरिता बजावलेल्या कामगिरीची सर्वांना माहिती व्हावी याकरिता पुस्तकाचे लेखन केले आहे. रुढ अर्थाने ते डोवाल यांचे चरित्र नाही. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार योगेश कुटे यांनी केले.
गुप्तहेर म्हणजे सावलीच्या अनोख्या जगात वावरण्याचे काम 
सर्वसामान्यांना गुप्तहेरांच्या कामाबद्द्ल प्रचंड कुतूहल असते. सत्य,भास आणि आभास याची प्रचिती देणारे काम गुप्तहेरांचे असते. आपल्याच सावलीच्या अनोख्या जगात राहण्याचे काम त्यांना करावे लागते. गोंधळाची परिस्थिती असताना त्या परिस्थितीचा फायदा घेणारा कुशल गुप्तहेर असतो. त्याला नेहमीच पडद्याआडून काम करावे लागते. डोवाल यांची कामगिरी वादातीत असून त्यासाठी त्यांनी खडतर परिश्रम घेतले. अनेकदा जीवावरची जोखीम पत्करुन त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिल्याचे पारसनीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a comment

0.0/5