Skip to content Skip to footer

आगीच्या झळा साेसताना त्यांनी केले 10 वीचे शिखर सर

घरच्या परिस्थितीमुळे शिकता आलं नाही. मनात शिकण्याची इच्छा कायम हाेती. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी नाेकरी मिळवणे गरजेचे हाेते. फायर ब्रिगेडमध्ये नाेकरी मिळवली देखील. परंतु 10 वी पास व्हायचं त्यांच्या मनात हाेतंच. यंदा त्यांनी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि ते पासही झाले. ही कहाणी आहे पुण्यातील अग्निशमन दलात फायरमन म्हणून काम करणाऱ्या राजेश घडशी यांची.

राजेश घडशी हे पुण्याच्या अग्निशमन दलाच्या मुख्य स्टेशनमध्ये फायरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यांच वय 37 वर्ष आहे. परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण साेडावे लागले हाेते. घराला हातभार लावण्यासाठी 2007 मध्ये ते अग्निशमन दलात नाेकरी करु लागले. अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचं त्यांच्या मनात हाेतं. परंतु दरवर्षी दहावीचा 17 क्रमांकाचा फाॅर्म भरणं राहून जात हाेतं. या वर्षी पत्नी, मुलांनी देखील फाॅर्म भरण्याचा आग्रह केला. ज्ञानप्रसारक विद्या मंदिर या शाळेच्या शिक्षकांचे तसेच खासगी क्लासचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी चिकाटीने अभ्यास करुन दहावी पास हाेत 44 टक्के मार्ग मिळवले. पुणे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी देखील त्यांचे काैतुक केले.

राजेश राेज मनापासून अभ्यास करत. कामावर असताना सुद्धा जेव्हा त्यांना वेळ मिळत असे ते अभ्यास करत. काही अडलच तर त्यांना त्यांचे इतर सहकारी मदत करत असत. राजेश यांच्या घरी आई वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा हा 9 वीत तर मुलगी 5 वीत आहे. मुलं घरी अभ्यास करायला बसले की राजेश हे सुद्धा त्यांच्यासाेबत अभ्यास करत असत. राजेश यांनी 10 वीची परीक्षा द्यावी अशी त्यांच्या घरच्यांची देखील इच्छा हाेती. मुलांनी देखील त्यांना परीक्षा देण्याची गळ घातली.

10 वी पास झाल्यानंतर आता पुढे उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय राजेश यांनी घेतला आहे. नाेकरी सांभाळत त्यांना पुढील शिक्षण पूर्ण करायचे आहे. 10 वी पास झाल्यानं राजेश यांच्या घरी उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a comment

0.0/5