Skip to content Skip to footer

सॉफ्टवेअर इंजिनिअरने प्रेयसीची चाकूने वार करुन केली हत्या

दुसरा मुलगा ही आपल्या प्रेयसीवर प्रेम करीत असल्याच्या संशयावरुन एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने चाकूने वार करुन आपल्या प्रेयसीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंदननगर येथे ही घटना घडली आहे. मीना पटले (वय 23, रा़. चंदननगर) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी किरण अशोक शिंदे (वय 25, रा. काळेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किरण शिंदे याचा मित्र प्रकाश बापू गप्पाट याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण शिंदे हा काळेवाडी येथे आपल्या आई-वडिलांसह राहत असून तो इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. तसेच तो हिंजवडी येथील एका कंपनीत काम करीत आहे. मीना पटले ही मुळची गोंदिया येथील राहणारी असून तिने नर्सिगचा कोर्स केला आहे. वल्लभनगर येथील एका कॉलसेंटरमध्ये बॅक ऑफिसमध्ये ती काम करत होती. सुरुवातीला तीही काळेवाडी येथे राहात होती. त्यातून किरण शिंदे याच्याबरोबर तिची ओळख झाली होती.
गेल्या एक वर्षापासून त्यांचे प्रेमसंबंध होते. पण गेल्या सहा महिन्यांपासून मीनावर आणखी एक जण प्रेम करीत असल्याचा किरणला संशय आला होता. त्यातून त्यांच्यात सतत भांडणं होत होती. त्यामुळे गेल्या तीन  महिन्यांपासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. या प्रकारामुळे किरण खूप अस्वस्थ होता. तो गेल्या दोन दिवसांपासून घरीही गेला नव्हता. मीना सध्या चंदननगर येथे राहायला आली होती. किरण  शिंदे याने तिला मंगळवारी (11 जून) रात्री चंदननगरमधील टाटा गार्ड रुम जवळ बोलावून घेतले होते. तिथे त्यांच्यात पुन्हा एकदा यावरून वाद झाल्यावर त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मीनाला पाहून किरण पळून गेला. जखमी अवस्थेत मीना हिला कोकडे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री अकरा वाजता तिचा मृत्यू झाला. किरण याने आपला मोबाईल बंद ठेवला असून चंदननगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Leave a comment

0.0/5