दौंड तालुक्यातील धरणग्रस्त शेतकऱ्याने संध्याकाळी पुणेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावरील जाळीवर उतरुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. धनाजी गेनबा धुमाळ वय ७७ हे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना यावेळी बाहेर खेचुन प्रसंग टाळला. दरम्यान, याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी धुमाळ यांना ताब्यात घेउन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१९५८ साली धरणासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यात यांचा धुमाळ यांचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांचे दौंड तालुक्यातील सोनवडी या गावी त्यांचे १९६१ साली पुनर्वसन करण्यात आले. त्यांना निवासासाठी देण्यात आलेले भूखंड आजतागायत २९ धरणग्रस्तांच्या नावावर झालेले नाहीत. धरणग्रस्तांच्या अनेक प्रश्नांना न्याय मिळवण्यासाठी धुमाळ ३० वर्षापासुन प्रयत्न करत आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील आवश्यक कार्यवाही होत नसल्यामुळे धुमाळ उद्विग्न झाले होते.
धुमाळ म्हणाले ,धरणग्रस्तांच्या वर्ग एकच्या जमिनी संपादित केल्या व देताना वर्ग दोनच्या देण्यात आल्या. अनेकांनी धरणग्रस्तांच्या जागेत अतिक्रमण केले आहे. न्याय मिळण्यासाठी ३० वर्षापासुन माझे प्रयत्न सुरु आहेत. सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन देखील आवश्यक कार्यवाही होत नाही. या प्रकरणातील २९ धरणग्रस्तांपैकी २५ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी किती वर्ष लागणार हे काम होण्याला असा प्रश्न उपस्थित होत आहे .
धुमाळ यांची बातमी समजताच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, प. महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल चव्हाण, प. महाराष्ट्र युवा आ. प्रमुख अभिमन्यू शेलार .महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख सीमा नरोडे, जिल्हाध्यक्ष शरद गद्रे, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण रांजणे,बाबा पडवळ, निखिल सेवकरी, योगेश गायकवाड, पंकज गायकवाड, हमीद सैयद आदी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. अध्यक्ष व इतर कार्यकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. जिल्हा पुनर्वसन अधिकायार्ने दौंड तहसिलदारांना फोन करुन उद्या सर्व दप्तर व संबंधित कर्मचाऱ्यांसह पुणे पुनर्वसन कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले. उद्याच धुमाळ यांची सर्व काम करुन देण्याचे आश्वासन दिले.