समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे या विचाराने वयाच्या 19 व्या वर्षापासून रक्तदान केलेल्या राम बांगड यांनी आत्तापर्यंत तब्बल 128 वेळा रक्तदान केले आहे. एवढेच नाहीतर आज जागतिक रक्तदाता दिनानिमित्त ते 19 व्या वेळा प्लेटलेट दान सुद्धा करणार आहेत. .
रक्तदान करण्याचे आवाहन सर्वच माध्यमातून करण्यात येते. परंतु जेवढी रक्ताची गरज असते तितके रक्त संकलित हाेत नाही. त्यामुळे गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे या हेतूने बांगड यांनी रक्ताचे नाते हि ट्रस्ट सुरु केली. या ट्रस्टच्या माध्यमातून आत्तापर्यंत हजाराे रुग्णांना रक्त उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बांगड हे 63 वर्षांचे आहेत. त्यांनी आत्तापर्यंत तब्बल 128 वेळा रक्तदान केले आहे. त्यांच्या संस्थेमार्फत रुग्णांना लवकरात लवकर रक्त उपलब्ध करुन दिले जाते. केवळ पुण्यातच नाहीतर राज्यातील विविध भागात त्यांच्या संस्थेचे काम सुरु असून इतर राज्यातील रुग्णांना देखील संस्थेकडून मदत करण्यात आली आहे. त्यांच्या या कार्यात अनेक रक्तदाते जाेडले गेले आहे. रक्तदान केल्यानंतर चांगलं वाटतं असं ते आवर्जुन सांगतात.
लाेकमतशी बाेलताना बांगड म्हणाले, वयाच्या 19 व्या वर्षी मी पहिल्यांदा रक्तदान केले. मी ज्या भागात राहताे तिथल्या गरिबांचे प्रश्न पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे मनात आले. त्यावेळी शहरात रक्ताचा पुरवठा कमी असायचा तसेच रक्तासाठी खूप धावपळ करावी लागत असे. मी बॅंकेत काम करायचाे. तिथे मी रक्तदानाबाबतचा बाेर्ड लावला हाेता. त्यातून आम्ही एक रक्तदात्यांची डिरेक्टरी तयार केली.