Skip to content Skip to footer

पुण्याच्या वेशीवर पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन

पुण्याच्या वेशीवर उत्तमनगर या गावातील हाॅटेल पिकाॅकसमाेर रात्री दहाच्या सुमारास बिबट्या दिसल्याचा दावा हाॅटेलचे मालक  भगवान गायकवाड यांनी केला आहे. या भागात बिबट्याचे ठसे सुद्धा दिसून आले असून याबाबत तज्ज्ञांकडून माहिती घेऊन ठाेसपणे सांगता येईल असे स्थानिक पाेलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुण्यापासून जवळच असलेल्या उत्तमनगर भागात हा बिबट्या रात्री दहाच्या सुमारास आढळून आला. हाॅटेल पिकाॅकच्या समाेरुन हा बिबट्या प्रकाश ताेडकर यांच्या शेतात गेल्याचे गायकवाड यांनी पाहिले. त्यांनी तात्काळ ताेडकर यांना माहिती दिली. हाॅटेलचे सीसीटिव्ही फुटेज पाहिले असता बिबट्या हाॅटेलसमाेरुन पळत जात असल्याचे दिसून आले. बिबट्या ज्या दिशेने गेला त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता बिबट्याचे ठसे ताेडकर यांच्या शेतात आढळून आले. त्यामुळे परिसरात सध्या घबराटीचे वातावरण आहे.

ताेडकर म्हणाले, काल रात्री 10 च्या सुमारास बिबट्या आमच्या शेतात गेला असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. आम्ही त्यांच्या हाॅटेलचे सीसीटिव्ही फुटेज चेक केले असता बिबट्या शेतात पळताना दिसला. त्यामुळे बिबट्या गेला त्या दिशेने जाऊन आम्ही पाहिले असता शेतात बिबट्याच्या पाऊलाचे ठसे आढळून आले. शेजारीच एनडीए असून तिथे माेठ्याप्रमाणावर जंगल आहे. त्या जंगलात बिबट्या असण्याची शक्यता आहे. त्याच दिशेने हा बिबट्या जाताना दिसला. आम्ही शेतात घर असलेल्यांना रात्री घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. याबाबत अद्याप वन विभागाला कळविण्यात आलेले नाही.

 

Leave a comment

0.0/5