तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ दुपारी दीड ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत काही तांत्रिक कारणांमुळे बंद पडले. मात्र, त्यामुळे दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शिवाजीनगर येथील तंत्रनिकेतनमध्ये (पॉलिटेक्निक ) आलेल्या विद्यार्थी व पालकांना संकेतस्थळ सुरू होण्याची वाट पाहावी लागली. येत्या मंगळवारी प्रवेशाची मुदत संपत असल्याने अभियांत्रिकी पदविका अभ्यसक्रमास प्रवेश मिळणार का? अशी भिती पालक व विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली.
तंत्र शिक्षण विभागाने पदविका अभ्यासक्रमास अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत,यासाठी विशेष मोहिम हाती घेतली आहे.त्याचाच एक भाग म्हणून राज्यभर विद्यार्थी व पालकांसाठी समुपदेशनाचे वर्ग घेण्यात आले.दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्वरीतच पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.मात्र,दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असला तरी विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका लवकर प्राप्त झाल्या नाहीत.तसेच अनेक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नाही. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरून त्यास मंजूरी घेण्यासाठी कमी कालावधी मिळाला.
सोमवारी शिवाजीनगर येथील तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली.मात्र,संकेतस्थळ बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना सुमारे चार ते पाच तास विनाकारण तंत्रनिकेतनमध्ये बसून रहावे लागले.प्रवेशासाठी तंत्रनिकेतनमध्ये आलेले पालक चंद्रकांत हिंगे म्हणाले,विद्यार्थ्यांना दहावीच्या गुणपत्रिका उशीरा मिळाल्या.त्याचप्रमाणे शाळा सोडल्याचा दाखला मिळण्यासही उशीर झाला.त्यातच येत्या मंगळवारी प्रवेश अर्ज भरण्याची मुदत संपणार असल्याचे तंत्र शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.त्यामुळे अनेक विद्यर्थी व पालक तंत्रनिकेतनमध्ये आले होते.परंतु,दुपारी संकेतस्थळ बंद असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज न भरताच परत जावे लागेल.त्यामुळे तंत्र शिक्षण विभागाने प्रवेश अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी.
तंत्र शिक्षण विभागाचे संकेतस्थळ काही तांत्रिक कारणामुळे दुपारपासून बंद होते.त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज सादर करता आले नाही.एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये,यासाठी प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्याबाबत वरिष्ठ स्थरावर चर्चा सुरू आहे.प्रवेश अर्ज भरण्यासाठी अवधी मिळणार आहे.त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी घाबरून जाऊ नये. -दिलीप नंदनवार, सहसंचालक तंत्र शिक्षण विभाग,पुणे