पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) भोंगळ कारभारावर मंगळवार (दि.१८) रोजी झालेल्या महापालिकेच्यामुख्य सभेत विरोधकांनी चांगलेच ताशेरे ओढले. गेल्या पाच वर्षांपासून पीएमपीच्या संचनल तुटीमध्ये वाढच होत असून, गत वर्षी संचलन तुटीतमध्ये तब्बल ४० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी दर वर्षी या संचलन तुटीपोटी महापालिका दर वर्षी विकास कामांचे कोट्यवधी रुपये पीएमपीएमएला देते. परंतु ही तुट कमी करण्यासाठी, बस कार्यक्षमपणे चालविण्यासाठी, पुणेकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले जात नाहीत. यामध्ये प्रशसनाचा वचक नसल्याने व सत्ताधा-यांकडून दुर्लक्ष होत असल्यानेच पीएमपी बस खिळखिळी झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून सन २०१८-१९ या वर्षातील संचलन तुटीपोटी मागणी करण्यात आलेल्या पुणे महापालिकेच्या हिश्शची ६० टक्के रक्कम सन २०१९-२० वर्षात समान हप्त्यात अग्रीम स्वरुपात आदा करण्यासाठी व आता पर्यंत आदा करण्यात आलेल्या ४८ कोटी रुपयांच्या खर्चास पश्चात मान्यता मिळण्यासाठीचा ठराव मंगळवारी मुख्य सभेच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता.
या ठरावावर चर्चा करताना सदस्यांनी पीएपीएमएल प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर जोरदार टिका केली. यामध्ये अविनाश बागवे, प्रशांत जगताप, अरविंद श्ंिदे आणि दिलीप बराटे यांनी वस्तुस्थिती मांडत संचलन तुट वाढण्यास प्रशासन जबाबदार असल्याचे सांगितले. प्रशासनाकडून संचलन तुट कमी करण्यासाठी कोणत्याही उपाय-योजना होताना दिसत नाही. पीएमपी डेपोच्या अनेक मोक्याच्या जागा नाममात्र दराने भाडे तत्वावर देण्यात येतात.
जाहिरात धोरणाबाबत कोणतेही ठोस निर्णय नाहीत, अधिकारी आॅफीसमध्ये बसून रस्त्यावरील बसचे नियोजन करतात, बेकायदेशीर वाहतुक रोखण्यासाठी कोणत्याही उपाय-योजना केल्या जात नसल्याचे सदस्यांनी सांगितले. तर केंद्रात, राज्यात देखील भाजपचीच सत्ता असून देखील पीएमपी बस खरेदी असो की अन्य प्रश्न मार्गी लागत नसल्याची खंत देखील विरोधकांनी व्यक्त केली. यावर गेल्या साडे चार वर्षांमध्ये नवीन बस खरेदी करणे व पुणे शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केल्याचे सांगितले.
दरम्यान पीएमपीएमएलच्या अनेक बस जुन्या झाल्याने होणारे ब्रेक डाऊन, इंधन खर्चामध्ये झालेली वाढ, कर्मचा-यांचे पगार व इतर गोष्टींवर वाढत असलेला खर्च, बस डेपोसाठी जागा उपलब्ध नसल्याने वाढणारे डेड किलोमिटर आदी विविध कारणांमुळे संचलन तुट वाढत असल्याचे स्पष्टीकरण पीएमपीएमएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे दिले. तसेच येत्या दोन वर्षांत पीएमपीएमएलच्या ताफ्यामध्ये नव्याने १६४० बस दाखल होणार असून, यामुळे ही तुट कमी होण्यास मदत होणार असल्याचे देखील गुंडे यांनी सांगितले.