शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यात जून महिना सरत आला तरी पाऊस पडण्याचे चिन्ह दिसेनात. पाऊस लांबल्यास पाणी पुरवठ्याची स्थिती गंभीर होऊ शकते, यामुळेच महापालिकेच्या वतीने शहरामध्ये पाण्याची चोरी करणा-यावर कडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून मंगळवारी एरंडवणा येथील हिमाली सोसायटीतून २५ पाण्याच्या मोटारी जप्त करण्यात आल्या.
गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये पाणी टंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामध्ये महापालिकेकडून एक वेळच पाणी पुरवठा करण्यात येत असून, अनेक भागामध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. याशिवाय देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली महापालिकेची दर गुरुवारी पाणी पुरवठा बंद ठेऊन अघोषित पाणी कपात सुरु आहे. शहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने अनेक भागामध्ये पाणी चोरीच्या घटना देखील वाढल्या आहेत. अनधिकृत नळ कनेक्शन सोबतच अनेक भागात थेट महापालिकेच्या पाण्याच्या लाईनला मोटारी टाकून अधिकचे पाणी घेण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. या पाणी चोरीबाबत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरु केली असून, यासाठी स्वतंत्र भरारी पथके नियुक्त केली असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही.जी.कुलकर्णी यांनी दिली.
हिमाली सोसायटीमध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत कुलकर्णी यांनी सांगितले की, सोसायटीमधील काही रो हाऊसमध्ये मोटारी लावून पाणी चोरी केली जात असून, सोसायटी व लगतच्या परिसरात नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा मिळत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आली होती. या तक्ररी नुसार महापालिकेच्या भरारी पथकाने पाहणी केली असता येथील अनेक रो हाऊसमध्ये थेट पाईप लाईलाच मोटारी टाकून पाण्याची चोरी केली जात असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणाहून तब्बल २५ मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
पिण्याचे पाण्याची चोरी करून हे पाणी चक्क गाड्या धुण्यासाठी वापरले जात असल्याचे उघड झाले. त्यामुळे या सर्व मोटारी जप्त करण्यात आल्या असून, प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. दरम्यान अशा प्रकारे पुन्हा पाणी चोरी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संपूर्ण सोसायटीचा पाणी पुरवठा बंद करण्यात येईल, अशा इशारा पाणी पुरवठा विभागाने सोसायटीला दिला आहे. दरम्यान शहरामध्ये अशा प्रकारे पाणी चोरी करण्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे व्ही.जी.कुलकर्णी यांनी सांगितले.
पुढील सहा दिवस पुणेकरांना कमी दाबाने पाणी पुरवठा
महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणाच्या गेटची चाचणी व दुरुस्तीचे काम सुरु आहे. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली असून, बंद पाई लाईन मधून पाणी येणा-या प्रमाण कमी झाले आहे. यामुळे शहराला अपेक्षित पाणी पुरवठा करण्यास अनेक अडचणी येत असून, ही चाचणी पूर्ण करण्यासाठी किमान ५ ते ६ दिवस लागणार आहेत .यामुळे या कालावधीत शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने निविदेन काढून जाहीर केले आहे.