Skip to content Skip to footer

संजीव पुनाळेकर यांना कोठडी द्यावी – सीबीआय

अ‍ॅड़ संजीव पुनाळेकर यांच्याकडून जप्त केलेल्या इलेक्ट्रॉनिक साहित्यातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाल्याने त्यांच्याकडे चौकशीकरिता पुन्हा कोठडी देण्याची मागणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने न्यायालयाकडे केली आहे.
विशेष सत्र न्यायाधीश आर. एम. पांडे यांच्या न्यायालयात सध्या अ‍ॅड़ पुनाळेकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला दिल्याप्रकरणी अ‍ॅड़ पुनाळेकर आणि लिपिक विक्रम भावे यांना सीबीआयने गेल्या महिन्यात अटक केली आहे. सीबीआयचे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितले की, अ‍ॅड़ पुनाळेकर यांच्याकडील लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह असा इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त केला आहे.

पुनाळेकरांच्या मोबाईलमधील डेटाचे विश्लेषण केले असता सीबीआयला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असून, त्यादृष्टीने त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे. त्यामुळे अ‍ॅड. पुनाळेकर यांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली. न्यायालयाने या प्रकरणी गुरुवारी सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले असून, त्यानंतर जामीन अर्जावर सुनावणी होईल असे स्पष्ट केले आहे.

Leave a comment

0.0/5