काही वर्षांपूर्वी बंद पडलेली प्रीपेड रिक्षा सेवा शहरात पुन्हा लवकरच सुरू होणार आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, संगमवाडी व पुणेस्टेशन या चार ठिकाणांहून ही सेवा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा (आरटीए) कडून नुकतीच या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
शहरात काही वर्षांपूर्वी पुणे स्टेशन, स्वारगेट व शिवाजीनगर या वर्दळीच्या ठिकाणांहून प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला रिक्षांसह प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत होता. पण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अनेक त्रुटी राहिल्याने काही महिन्यांतच ही योजना गुंडाळावी लागली. आता पुन्हा साडे तीन ते चार वर्षांनी ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव नुकताच ‘आरटीए’समोर मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पूर्वीच्या तीन ठिकाणांमध्ये आता संगमवाडीचाही समावेश करण्यात आला आहे. चारही ठिकाणी बाहेरगावी ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या ठिकाणांना प्राधान्य देण्यात आले आहे.