सूर, ताल, लय यांचा अनोखा मिलाफ असणारे अभिजात संगीतप्रत्येकालाच भुरळ घालते. या कलेशी थेट नाळ जुळणे म्हणजे अहोभाग्यच! मात्र, संगीताशी अतूट नाते असूनही कायम पडद्यामागे राहणारे कलाकार म्हणजे वाद्य कारागीर. वाद्य कारागिरी ही संगीतसाधनाच असते, या कलेचेही संगोपन व्हावे, अशा भावना या पडद्यामागच्या कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या. काळ कितीही बदलला तरी संगीत अभिजातच आहे, जागतिक स्तरावर संगीताचे महत्व वादातीत आहे, असा सूरही या कलाकारांनी आळवला.
२१ जून अर्थात जागतिक संगीत दिवस. संगीत लोकाभिमुख व्हावे, यासाठी गायक, वादक प्रयत्नशील असतातच. परंतु, गायन, वादन खऱ्या अर्थाने खुलवणारे वाद्य कारागीरही संगीत क्षेत्राचा महत्वाचा स्तंभ आहे. तंबोरा सुरात लागला नाही तर गाणे फुलत नाही. सूर-तालाचे समीकरण जमवायचे असेल तर संगीताशी संबंधित प्रत्येक घटकाने संगीताचा बारकाईने अभ्यास करावा, असे वाद्य कारागीरांनी सांगितले.
पुरुषोत्तम जोग म्हणाले, ‘मी २००० सालापासून या क्षेत्रात कार्यरत आहे. व्हायोलिन, तबला, तानपुरा, गिटार, मेंडोलिन अशी अनेक वाद्ये आपल्याकडे दुरुस्तीसाठी येतात. वाद्यांचे ट्युनिंग हा आनंददायी प्रकार असतो. वाद्य कारागीर हे पडद्यामागचे कलाकार असतात. मात्र, तरीही संगीत क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असल्याचे समाधान वाटते. इलेक्ट्रॉनिक वाद्ये केवळ सोय म्हणून ठीक आहेत. मात्र, पारंपरिक वाद्यांचे सौैंदर्य काही वेगळेच असते. संगीताकडे नवीन पिढीचा ओढा वाढत आहे. संगीत कधीच लोप पावणार नाही. कारण, ते अमर, अभिजात आहे.’