फडके हौद चौकातील मेट्रो स्थानकाचे स्थलांतर : बाधितांचे पुनर्वसन टळले

फडके हौद | Migration of Metro station to Phadke Houd Chowk

कृषी महाविद्यालय ते स्वारगेट या ५ किलोमीटरच्या भुयारी मार्गातील फडके हौद चौकातील मेट्रो स्थानकाची जागा अखेर तेथील बाधीतांच्या मागणीनंतर बदलण्यात आली आहे. आता हे स्थानक त्याच चौकापासून थोडे मागे असलेल्या पालिकेच्या एका शाळेच्या जागेत करण्यात येईल.फडके हौद चौकातील जागा बदलण्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनीच दिली.

मेट्रोच्या कामाचा कोणाही नागरिकांना त्रास होऊ नये अशीच महामेट्रोची इच्छा आहे. तेथील २४८ बाधितांचे महामेट्रो त्यांच्या सांगण्यानुसार पुनर्वसन करणार होती, मात्र त्यांचा ठाम नकार लक्षात घेऊन आता स्थानकाची जागाच बदलण्यात आली आहे असे ते म्हणाले. या बाधितांचे पुनर्वसन पालिकेच्या ज्या शाळेच्या जागेवर करण्यात येणार होते, तिथेच आता स्थानक असेल. जागा पालिकेची आहे, त्यामुळे मेट्रोच्या खर्चात बचत झाली आहे असा दावाही दीक्षित यांनी केला.

फडके हौद चौकात मेट्रोचे भुयारी स्थानक असणार होते. त्या स्थानकातून वर रस्त्यावर येण्याजाण्यासाठी म्हणून महामेट्रोला जागा हवी होती. त्यासाठी तेथील खासगी जागा मालकांबरोबर संपर्क साधण्यात आला होता. एकूण २४८ कुटुंबे बाधीत होत होती. जागेचे मालक तसेच भाडेकरू यांनाही नुकसान भरपाई देण्याची तयारी महामेट्रोने दर्शवली. त्याजागेपासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या पालिकेच्या शाळेच्या जागेवर नवी इमारत बांधून तिथे या कुटुंबांना खोल्या देण्यात येणार होत्या. काहींना ते मान्य होते तर काहींनी ते अमान्य केले. त्यानंतर या विषयात राजकीय शिरकाव झाला.

बाधित कुटुंबांनी एक कृती समिती स्थापन केली. मेट्रोचे स्थानक करण्याला विरोध सुरू केला. घरे देणार नाही, जागा देणार नाही असा निर्धार व्यक्त केला. तरीही मेट्रो कडून बोलणी सुरू होती, मात्र ती बाधितांच्या भूमिकेमुळे अयशस्वी होत होती. त्यातच तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी कसबा माझा हक्काचा घरातील मतदारसंघ आहे, त्यामुळे मी कोणालाही बेघर होऊ देणार नाही, मेट्रोचे स्थानक तिथेच होईल अशी भूमिका घेतली, मात्र त्यात राजकीय तोटा होण्याचे लक्षात आल्यावर त्यांनीच आता जागा बदलण्याच्या निर्णयास संमती दिली आहे.
नगर रस्त्यावरील मेट्रो मार्गासंदर्भातील अशाच वादाबाबत बापट यांनीच आगाखान पॅलेससमोरूनच हा मार्ग जाईल असे आश्वासन दिले होते, मात्र तिथे आता महामेट्रोने कल्याणीनगर परिसरात कामही सुरू केले आहे. पुर्वी आगाखान पॅलेस च्या समोरून हा मार्ग जात होता. मात्र राष्ट्रीय स्मारकासंबधी असलेल्या निर्णयामुळे या मार्गाला नकार देण्यात आला. कायदाच असल्यामुळे महामेट्रोने सुमारे १ किलोमीटरचा वळसा घेत हा मार्ग कल्याणीनगरमधून पुढे नेण्याचा निर्णय घेतला.

पालिकेच्या या शाळेच्या जागेचे क्षेत्रफळ कमी असल्यामुळे तिथे नव्या तंत्रज्ञानाने स्थानकाची जागा भुयारात तयार केली जाईल. म्हणजे जमिनीत आधी सरळ १८ फूट खोलीचे छिद्र घेतले जाईल. त्यानंतर त्या छिद्राचा खालच्या खालीच विस्तार केला जाईल व स्थानकासाठी फलाटाची जागा तयार केली जाईल. प्रवाशांना रस्त्यावर येण्याजाण्यासाठीचा मार्ग करण्यासाठी मात्र ही जागा पुरेशी आहे. त्यामुळे फारशी अडचण येणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here