Skip to content Skip to footer

विद्युत खांबांचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : दीपक म्हैसेकर

काही दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यात पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायमास्ट दिव्यांच्या (प्रखर विद्युत झोत असलेले दिवे) खांबाचे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. या खाबांच्या मजबुतीची चाचणी (स्ट्रक्चरल ऑडिट) करावी आणि कमकुवत खांबांची तातडीनी दुरुस्ती करावी असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले. तसेच, या कामात कुचराईमुळे कोणतीही दुर्घटना घडल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा त्यांनी दिला.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांची आणि मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील दौंड तालुक्यातील वरवंड पालखी तळाला म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालखी तळावर उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात कोसळल्याचे सांगितले. त्याची दखल घेत, म्हैसेकर यांनी हायमास्ट दिव्यांच्या पायाची पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील तळावर उभारण्यात आलेल्या सर्वच दिव्यांच्या खांबाची मजबुती तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले.
ही बाब अत्यंत गंभीर असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची सूचना त्यांनी केली. हायमास्ट दिवे योग्यरित्या उभारणे शक्य नसल्यास त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची दिव्यांची व्यवस्था करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
तीर्थ क्षेत्र व विकास निधीतून नीरा नरसिंहपूर येथील देवस्थानाच्या विकासकामांनाही म्हैसेकर यांनी भेट दिली. कामाचा दर्जा राखत, जलदगतीने काम पूर्ण करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना केली.

Leave a comment

0.0/5