चंदननगर : पुणे महानगरपालिकेचा नालेसफाई हा वार्षिक कार्यक्रम असतो आणि तो तितकाच संशयास्पद असतो. बऱ्याचदा नालेसफाई केवळ ‘हाथ की सफाई’ असल्याचे जाणवते. वडगावशेरी, चंदननगर परिसरातील सर्व नाले हे मुळा-मुठा नदीला जाऊनच मिळतात. ‘लोकमत’ने वडगावशेरी- खराडी परिसरातील नालेसफाईची पाहणी केली असता वडगावशेरीतील हरिनगर येथील नाला, सैनिकवाडीतून वाहणारा नाला, खराडीतील औद्योगिक वसाहतीतील नाला, खराडीतील एकनाथ पठारे वस्ती येथून वाहणारा नाला, चौधरी वस्ती येथून वाहणारा नाला अद्यापही साफ झालेला नाही.
त्यामुळे महापालिकेने केलेला दावा हा केवळ हाथ की सफाई मोहीम असल्याचे दिसून आले आहे. एकंदरीत परिसरातील नाल्यांची साफसफाई झाली नाही.कारण वरील सर्व नाल्यांमध्ये प्रचंड कचरा, घाण, डुकरांचा वावर असल्यामुळे महापालिकेने कितीही दावे केले तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती खराब आहे. सर्व नाले घाणीने, कचºयाने खचाखच भरलेले आहेत.याबाबत नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी राजेश बनकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
कॅरिबॅगमुळे तुंबतात नाले
पावसाळ्यात हे नाले तुडुंब भरून रस्त्यावर पाणी साचते तेव्हा नाल्यांच्या सफाईचे पितळ उघडे पडते. वडगावशेरी, खराडीमधील सर्वच नाल्यांमध्ये चेंबरमधून ड्रेनेज ओसंडून वाहण्याचे प्रमाण जास्त असून त्याला कारणीभूत आहे ते कॅरिबॅग अनेक ठिकाणी वडगावशेरी ,खराडी भागातील ड्रेनेज हे प्लॅस्टिकच्या कॅरिबॅगमुळे ओंसाडून वाहत असल्याचे दिसून आले आहे.
मुळा-मुठेचे आरोग्य धोक्यातवडगावशेरी-खराडी परिसरातील गटारीचे पाणी सळसळत मुळा-मुठा नदीपात्रात येऊन मिसळत आहे. एकंदरीत वडगावशेरी, खराडी, लोहगाव या भागातील सर्व सांडपाणी हे मुळा-मुठा नदीपात्रात मिसळत असल्याने नदीचे पावित्र्य, आरोग्य धोक्यात आले आहे.
वडगावशेरी, खराडीतील नाले हेच रोगराईचे केंद्रबिंदू
वडगावशेरी खराडी परिसरातील नाले कधीच साफ होत नाहीत. या नाल्यांत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हा कचरा वर्षानुवर्षे नाल्यात पडून आहे, तो कुजला आहे. तसेच परिसरात मोकाट डुकरांचाही मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. ही डुकरे अन्नाच्या शोधात संपूर्ण नाल्यात कचरा पांगविण्याचे काम उत्तमपणे करतात. नाल्यामधील कचरा दुर्गंधी सोडतो.
रस्ता उंच, घरे खाली
वडगावशेरी, खराडी परिसरात काही ठिकाणी रस्ते उंच झाले असून, रहिवाशांची घरे त्यापेक्षा खाली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून रहिवाशांच्या घरात जाते. त्यामुळे पावसाळ्यात गोरगरीब नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. मनपाने रस्त्याच्या उंचीपेक्षा खाली असलेल्या रहिवासी भागात मुरूम टाकून नियोजन करण्याची गरज आहे.
गटारीची प्रचंड दुरवस्था
परिसरातील गटारीची अत्यंत दुर्दशा झाली आहे. अनेक गटारवाहिन्या २५ वर्षे जुन्या असून, सर्वच परिसरातील लोकवस्तीच्या मानाने त्या गटारवाहिन्या छोट्या पडतात. जुनी गटारे अनेक ठिकाणी तुटली-फुटली असून, घुशीमुळे ठिकठिकाणी बिळे तयार झाली आहेत. झोपडपट्टी भागातील उघड्या गटारीत घाण कचरा टाकला जात असल्याने त्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून झोपडपट्टीतल्या घरात पाणी शिरते. खुळेवाडी झोपडपट्टी, रामवाडी झोपडपट्टीसह वडगावशेरीतील नाल्यावर बांधलेल्या उज्वला सोसायटीमध्ये दरवर्षी पावसाचे पाणी घुसते.
गाळ पुन्हा नाल्यात
वडगावशेरी, चंदननगरमधील नाल्याची पाहणी केली असता काही नाले काही प्रमाणात साफ केले आहेत. मात्र साफ केलेला गाळ, कचरा त्याच नाल्याच्या कडेला टाकला आहे. म्हणजे पुन्हा जोरदार पाऊस झाला की तो गाळ, कचरा नाल्यात म्हणजे नालेसफाई ही केवळ ठेकेदार जगवण्यासाठी केली जात आहे.
मला नाही माहीत
याबाबत प्रभाग क्र. ४ खराडी-चंदननगर अभियंता महादेव बोबडे यांच्या संपर्क साधला असता ते म्हणाले मला माहीत नाही, तुम्ही क्षेत्रीय कार्यालयात या, मी माहिती घेऊन देतो. प्रभागाच्या अभियंत्यालाच माहीत नाही की आपल्या प्रभागातील नाल्याची साफसफाई झाली की नाही?
कोट्यवधी निधी पाण्यात
नाले सफाईसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात कोट्यवधीच्या निविदा काढल्या जातात. मात्र कोट्यवधी रुपये जातात कुठे? हा मोठा परिसरातील नाल्यांची अवस्था पाहून प्रश्न पडतो.