Skip to content Skip to footer

मुंबई – पुणेकरांसाठी खुशखबर शिवनेरीच्या तिकीट दारात कपात….

शिवनेरी व अश्वमेध बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशासाठी एसटी महामंडळाकडून खुशखबर देण्यात आली आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणारी शिवनेरी बसेसच्या तिकीट दरात कपात करण्यात आली आहे. ८० ते १२० रुपयांपर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या ८ जुलै पासून लागू होणार आहेत. गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची “शिवनेरी” हि बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. त्यामुळे खाजगी वाहतुकीच्या अवाढव्य भाड्याला चाप लागणार आहे

सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जाते. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवण्याचा उद्देश असल्याचे मंत्री रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला, उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे.

त्यामुळे एसटी महामंडळाने या बस सेवेतील तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला.

Leave a comment

0.0/5