खड्डेमय दिवे घाट मृत्यूचा सापळा

दिवे घाट | Crater lamp traps the death trap

सासवड – येथून जवळील दिवेघाटात मंगळवारी (दि. 19) सकाळी पालखी सोहळ्यात जेसीबी शिरल्याने मोठी दुर्घटना घडली या दुर्घटनेमुळे दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून 15 वारकरी जखमी झाले आहेत.एकंदरीतच या अपघातामुळे राष्ट्रीय पालखी महामार्गाची (एनएच965) च्या दुरवस्था व रखडलेले काम पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून खड्डेमय दिवे घाट आणखी किती बळी घेणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग (एनएच 965) हा राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे वर्ग झालेला आहे. या महामार्ग करता मोठ्या प्रमाणात निधी देखील मंजूर झालेला आहे; मात्र या महामार्गाचे तब्बल दहा वर्षांपासून रुंदीकरणाचे काम रखडले आहे.माउलींच्या पालखी सोहळ्याअगोदर केवळ तात्पुरती डागडुजी करण्यावरच प्रशासनाचा जोर असतो वारकऱ्यांनी ही वारंवार मागणी करून देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नसून सध्या घाटात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठाले खड्डे पडलेले असल्यामुळे खड्डे चुकवताना वाहनांचा अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाला आहे.

पुरंदर तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली त्यामुळे घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत. या घाटातील डोंगरकड्यांचे ऑडिट करणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच दरड कोसळू नये म्हणून संरक्षक जाळ्या बसविणे गरजेचे आहे याबाबत प्रशासनाला वारंवार कल्पना देऊनही याकडे दुर्लक्षच केले जात आहे. रस्त्या घाटात अनेक ठिकाणी दिशादर्शक, सूचना फलक लावलेले नाही तर घाटातील संरक्षक कठडे ढासळले आहे.दरम्यान, मंगळवारी सकाळी झालेल्या वारकऱ्यांच्या अपघातास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना का जबाबदार धरले जाऊ नये ? असाही संतप्त सवाल विचारला जात आहे.

पालखी सोहळ्यास सोयी-सुविधा नव्हत्या
दिवे घाटातून आळंदीकडे निघालेल्या या पालखी सोहळ्याला पोलीस प्रशासनाचे कोणतेही संरक्षण नव्हते, रुग्णवाहिका, पाण्याचा टॅंकर अशा कोणत्याही शासकीय सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या नियमानुसार पालखी सोहळ्यास या सर्व अत्यावश्‍यक सेवा दिल्या जाणे गरजेचे असताना केवळ संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पंढरपूरकडे जात असताना प्रशासन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करते; मात्र पंढरपूरवरून आळंदीकडे संजीवनी समाधी सोहळ्या करता जाणाऱ्या पालखी सोहळ्याला प्रशासनाकडून कोणतीही सोयी-सुविधा पुरवल्या जात नाही याची खंत देखील वारकऱ्यांनी बोलून दाखवली.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख – पालकमंत्री
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज झालेल्या अपघातातील जखमींची चौकशी करण्याकरता हडपसर येथील खासगी रुग्णालयात भेट दिली यावेळी बोलताना त्यांनी मयत वारकऱ्यांच्या कुटुंबास प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर केली असून जखमींचे सर्व उपचार मोफत केले जातील असे आश्‍वासनही त्यांनी दिले आहे. तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनीही जखमी वारकऱ्यांची भेट घेऊन डॉक्‍टरांशी वारकऱ्यांच्या प्रकृती विषयी चर्चा केली.तसेच कसलीही गरज लागल्यास मी सदैव तुमच्या मदतीला धावून येणार असल्याचे आश्‍वासन दिले. याचबरोबर दिंडीतील वारकऱ्यांना संजय जगताप मित्र परिवारातर्फे सामाजिक भान जपत हॉस्पिटलमध्येच जेवणाची सोय देखील केली गेली होती.
अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही?
अनेक वर्षे प्रलंबित असलेला राष्ट्रीय पालखी महामार्ग हा राज्य सरकारकडून केंद्र शासनाकडे वर्ग झाला असून सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे हा रस्त्याचा कारभार आहे; मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या महामार्गाकडे पाहण्यास वेळच नाही, फक्त टोलवाटोलवी करणे आणि उडवाउडवीचे उत्तर देणे यातच अधिकारी धन्यता मानतात. सध्या तर राष्ट्रपती राजवट लागू असल्याचे कारण पुढे करत अधिकाऱ्यांनी फोन उचलणे देखील बंद केले आहे.
सोपानमहाराज होते शिंपी व्यवसायात कुशल 
सोपानमहाराज नामदास हे संतश्रेष्ठ नामदेवमहाराज यांचे ते 17 वे वंशज होते. दरवर्षी आळंदीला होणाऱ्या संजीवन समाधी सोहळ्यास नामदेवांच्या पालखी सोहळ्यातील त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ हभप ज्ञानेश्‍वरमहाराज नामदास आणि हभप एकनाथ महाराज नामदास असा परिवार आहे. हभप सोपानमहाराज यांचे आचरण वारकरी संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे होते. मात्र, त्यांचा पारंपरिक शिंपी कामाचा व्यवसाय देखील ते अत्यंत कुशलतेने करीत होते.
संत नामदेवांच्या घरी असलेल्या विठ्ठलमूर्तीची अर्चना आणि नामदेवांच्या कामाचा प्रचार प्रसाराची सेवा त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि प्रवचनांमधून अखंडपणे केली. नामदेवमहाराजांचा समाधीसोहळा हा या घराण्याचा महत्त्वाचा उत्सवच आहे, त्यामुळे या सोहळ्याचे नेतृत्वही त्यांनी आतापर्यंत केले आहे.आजची घडलेली दुर्घटना ही अतिशय दुःखद असून यामुळे वारकरी संप्रदाय संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मृत वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. पुणे-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाचे काम गेली 10 वर्षे रखडलेले आहे. आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आता पुरंदरचा लोकप्रतिनिधी म्हणून या महामार्गाचे रखडलेल्या काम त्वरित पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here