शहराची पहाट आता धुक्याची!

पुणे | The dawn of the city is now a threat!

पुणे : शहर आणि परिसरात कधी ढगाळ, तर कधी निरभ्र आकाशाची स्थिती राहात असल्याने थंडीमध्ये चढ-उतार अनुभवण्यास मिळत आहेत. अशाच वातावरणात शहरात काही ठिकाणी पुढील चार ते पाच दिवस दाट धुके पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे. या काळामध्ये गारवा राहणार असला, तरी त्यातील चढ-उतार कायम राहणार असल्याचा अंदाज आहे.

देशाच्या मध्य भागात आणि त्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे संपूर्ण डिसेंबरमध्ये शहराच्या वातावरणावर मोठा परिणाम झाला. आकाशाची स्थिती बहुतांश वेळा अंशत: ढगाळ राहिल्याने संपूर्ण महिना कडाक्याच्या थंडीविना गेला. गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा डिसेंबरमध्ये किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली जाऊ शकले नाही. मात्र, ३१ डिसेंबरनंतर निरभ्र आकाश आणि कोरडय़ा हवामानाची स्थिची निर्माण झाल्याने किमान तापमानात घट झाली. त्यानंतर दोन ते तीन दिवस पहाटे कडाक्याची थंडी अनुभवता आली. या काळात तापमान सरासरीखाली आले नसले, तरी त्यात मोठय़ा प्रमाणावर घट दिसून आली. त्यानंतर मध्य प्रदेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम पुन्हा राज्याच्या वातावरणावर झाला.

मंगळवारपासून (७ जानेवारी) शहरात पुन्हा अंशत: ढगाळ वातावरण निर्माण झाले. परिणामी किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी झाली. ११ ते १२ अंशांवर आलेले किमान तापमान १५ ते १७ अंशांवर पोहोचले. सद्य:स्थितीत तापमानात पुन्हा काही प्रमाणात घट सुरू झाली आहे. गुरुवारी शहरात १४.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत ४.२ अंशांनी अधिक आहे.

ढगाळ स्थितीमुळे दिवसाच्या तापमानात मात्र चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी किमान तापमान २७.४ अंश नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत १.४ अंशांनी कमी होते. त्यामुळे दिवसाही हवेत गारवा जाणवत होता. पुढील आठवडाभराच्या काळात थंडीत चढ-उतार होत राहणार आहेत. या काळात मुख्यत: शहरातील विविध भागात दाट धुके अनुभवता येणार आहे.

आठवडय़ाचे हवामान कसे?
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार १० जानेवारीला शहर आणि परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहून तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस म्हणजे ११ आणि १२ जानेवारीला आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. या काळामध्ये गारव्यात काहीशी वाढ होऊ शकणार आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत पुन्हा आकाशाची स्थिती अंशत: ढगाळ राहणार आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत शहरात तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here