Skip to content Skip to footer

पुणे – चिनी नागरिकाने विमानात उलटी केल्याने थांबवलं विमान

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून सर्वसामान्य नागरिकांनीही याचा धसका घेतला आहे. पुणे विमानतळावर नुकतीच याची प्रचिती आली. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात चिनी नागरिकाने उलटी केल्याने इतर प्रवाशांनी प्रवास करण्यासाठी नकार दिला. यामुळे विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं. चीनमधील वुहान येथून या व्हायरसची लागण होण्यास सुरुवात झाली असून चीनमध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे इतर प्रवाशांना चिनी नागरिकाने उलटी केल्याने त्यालाही लागण झाली असल्याची भीती वाटली आणि त्यांनी प्रवास करण्यास नकार दिला.

“चीनच्या नागरिकाला अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळेच त्याने उलटी केली. त्याला सर्दी आणि खोकलाही आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आलं आहे. चिनी प्रवाशाने आपण गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीत होतो असा दावा केला आहे. त्यामुळे त्याला लागण झाल्याची शक्यता नसावी असं सांगितलं जात आहे. मात्र डॉक्टर सर्व खात्री करुन घेत आहेत. त्याच्या सगळ्या चाचण्या करण्यात येत असून आज किंवा उद्यापर्यंत रिपोर्ट येईल,” अशी माहिती पुणे महानगरपालिका आरोग्य प्रमुख रामचंद्र हंकारे यांनी दिली आहे. चिनी प्रवासी भुवनेश्वर, कोलकाता, दिल्ली येथून पुण्यात आला होता असंही त्यांनी सांगितलं आहे.

Leave a comment

0.0/5