Skip to content Skip to footer

महाराष्ट्रात मुंबई-पुण्यातली करोनाची स्थिती गंभीर: केंद्र सरकारचे निरीक्षण; पथक येणार पाहणीला

केंद्र सरकारने मंत्रिगटाची स्थापना केली असून सहा मंत्रिगटाचं हे पथक देशातील चार राज्यांमधील प्रमुख शहरांना भेटी देणार आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन केंद्रीय पथक पाहणी करणार आहे.  करोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्या दृष्टीने ही पाहणी महत्त्वाची ठरणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये हे पथक भेट देणार आहे. लॉकडाउनच्या नियमांचं पालन होतंय की नाही? केंद्र सरकारने लॉकडाउन दरम्यान जे नियम सांगितले आहेत त्यांचं उल्लंघन होत नाही ना? उल्लंघन झाल्याच्या राज्यात किती तक्रारी आहेत या सगळ्याचा आढावा हे पथक घेणार आहे.

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढते आहे. तसेच मुंबईतही महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण आहेत. या सगळ्या समस्येवर उपाय योजण्याचे काम सुरु आहे. मात्र रुग्णसंख्येत वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे आता चार राज्यांमध्ये केंद्राचे पथक येऊन पाहणी करणार आहे. देशातील लॉकडाउन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत की नाही याचीही पाहणी करण्यात येणार आहे.

अत्यावश्यक सेवा मिळत आहे की नाही, सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे का, आरोग्याच्या योग्य सोयी सुविधा आहेत का? आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांची परिस्थिती आणि राज्यात मजूर आणि गरिबांसाठी काय व्यवस्था केली याच आढावा हे केंद्रीय पथक घेणार आहे

Leave a comment

0.0/5